मुंबई : गुजरात टायटन्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यातील झालेल्या सामन्यात गुजरात संघाने विजय मिळवला आहे. या विजयासह गुजरात यंदाच्या मोसमातील प्ले-ऑफमध्ये आपली जागा पक्की करणारा पहिला संघ ठरला आहे. गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 188 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा संघाल 20 षटकांत 154-9 धावाच करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना क्लासेन याने एकट्याने 64 धावांची झुंजार खेळी केली. तर गुजरातकडून मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या.
हैदराबाद संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरल्यावर त्यांची सुरूवात एकदम खराब झाली होती. अभिषेक शर्मा 4 धावा, राहुल त्रिपाठी 1 धाव, एडन मार्कराम 10 धावा, अब्दुल समद 4 धावा, सनवीर सिंग 7 धावा या सुरूवातीच्या खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही. फक्त हेनरिक क्लासेन 64 धावा आणि भुवनेश्वर कुमार 27 धावा यांनी झुंज सुरू ठेवली होती. पण दोघे संघाला काही विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरले नाहीत.
गुजरात संघाची सुरूवात खराब झाली होती. भुवनेश्वर कुमारने साहाला शून्यावरच माघारी पाठवलं होतं. मात्र त्यानंतर साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोघांनीही हैदराबादच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. गिल शतक केल्यावर 1 काढून 101 धावांवर माघारी परतला. या खेळीमध्ये त्याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला. तर साई सुदर्शन याने 47 धावा केल्या.
भुवनेश्वर कुमार, फजलहक फारूकी आणि टी नटराजन या त्रिमुर्तींनी गुजरात संघाच्या मोठ्या धावसंख्येला फुलस्टॉप लावला. हार्दिक पांड्या 8 धावा, डेव्हिड मिलर 7 धावा, राहुल तेवतिया 3 धावा,राशिद खान 0 धावा आणि दासुन शनाका नाबाद 9 धावा यांना मोठी खेळी करता आली नाही.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (w), साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (c), डेव्हिड मिलर, दासुन शनाका, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद
सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), अब्दुल समद, सनवीर सिंग, मयंक मार्कंडे, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारूकी, टी नटराजन