मुंबई : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाने अंतिम फेरी गाठली आहे. आयपीएल इतिहासात चेन्नईने ही कामगिरी दहाव्यांदा केली आहे. चेन्नईने चार वेळाच जेतेपदावर नाव कोरता आलं आहे. क्वॉलिफायर फेरीत चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सला 20 षटकात 7 गडी गमवून 172 धावांचं आव्हान दिलं होतं. पण गुजरातचा संघ सर्वबाद 157 धावा करू शकला. गुजरातला 15 धावांनी पराभूत करत चेन्नईने अंतिम फेरी गाठली. गुजरातच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने सांगितलं की, संघाला चुकांची किंमत मोजावी लागली. पण पराभवाकडे न पाहता आता पुढे जाण्याची गरज आहे. आता आम्ही क्वॉलिफायर दोनसाठी तयारी करत आहोत. यानंतर हार्दिक पांड्याने इतर गोष्टींकडेही लक्ष वेधलं.
“मला वाटतं आमचा गोलंदाजीचा निर्णय योग्य होता. पण आम्ही काही चुका केल्या आणि त्याचा फटका आम्हाला बसला. आमच्याकडे ज्या पद्धतीचे गोलंदाज होते, ते पाहता आम्ही 15 धावा जास्त दिल्या असंच म्हणावं लागेल. त्याचबरोबर काही गोष्टी आम्ही बरोबर केल्या. आम्ही आमच्या योजनेनुसार पुढे जात होतो. पण मधल्या काही षटकात आमच्याकडून धावा गेल्या. पण याकडे आता जास्त लक्ष देण्याची गरज नाही.”, असंही हार्दिक पांड्या याने सांगितलं.
“आम्हाली दोन दिवसानंतर पुन्हा खेळायचं आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. आम्ही तेव्हा चांगलं प्रदर्शन करू आणि अंतिम फेरी गाठू.”, हार्दिक पांड्याने असं सांगत अंतिम फेरीत चेन्नई विरुद्ध गुजरात हा सामना होईल असं भाकीत केलं आहे. गुजरात क्वॉलिफायर 2 फेरीत मुंबई विरुद्ध लखनऊ या सामन्यातील विजेत्याशी लढणार आहे.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), दासुन शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, दर्शन नलकांडे, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन | एमएस धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश थेक्षाना.