IPL 2023 | केकेआरला मोठा झटका, स्टार खेळाडूची ऐन क्षणी तडकाफडकी माघार

| Updated on: Apr 28, 2023 | 5:14 PM

कोलकाता नाईट रायडर्स टीची आयपीएल 16 व्या मोसमात वाईट स्थिती आहे. अशातच केकेआरला मोठा झटका लागला आहे. मोठ्या खेळाडूने ऐन वेळेस टीमची साथ सोडली आहे.

IPL 2023 | केकेआरला मोठा झटका, स्टार खेळाडूची ऐन क्षणी तडकाफडकी माघार
Follow us on

मुंबई | आयपीएल 16 वा मोसम ऐन रंगात आला आहे. या हंगामातील पहिला टप्पा संपला आहे. प्रत्येक संघाने किमान 7 सामने जिंकले आहेत. आतापर्यंत एकूण 3 संघांनी सर्वाधिक 5 मॅच जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या पाचात स्थान मिळवलं आहे. पहिला टप्पा संपल्याने आता प्लेऑफ क्वालिफाय होण्यासाठी उर्वरित सामन्यांपैकी बहुतांश सामने जिंकण्याचा प्रयत्न प्रत्येक टीमचा असणार आहे. त्यामुळे या दुसऱ्या टप्प्यात क्रिकेट चाहत्यांना चांगलीच रस्सीखेच आणि काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. अशा परिस्थितीत कोलकाता नाईट रायडर्स टीमला मोठा झटका लागला आहे. केकेआरचा मॅचविनर खेळाडूने आयपीएल 16 व्या हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंटला मोठा झटका लागला आहे.

कोण आहे तो खेळाडू?

केकेआर विकेटकीपर बॅट्समन लिटन दास याने आयपीएल 2023 मधून माघार घेत असल्याचं जाहीर केलंय. कौटुंबिक कारणाने दासने माघार घेतल्याचं म्हटलं जात आहे. दास आधी ऑलराउंडर शाकिब अल हसन यानेही आयपीएल सोडलं होतं. शाकिब बांगलादेशचा कर्णधार आहे. बांगलादेश क्रिकेट टीमचे आगामी सामने पाहता शाकिबने माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.

केकेआरकडून दासच्या माघार घेतल्याबाबत पत्रक काढण्यात आलंय. त्यानुसार “लिटन दास याला कौटुंबिक वैदयकीय कारणांमुळे 28 एप्रिल रोजी बांगालदेश इथे परतावं लागलं आहे. आमच्या शुभेच्छा त्याच्या आणि कुटुंबियाच्या पाठीशी आहेत. तो यातून लवकर बाहेर पडावा, अशी आमची इच्छा आहे”,असं या पत्रकात म्हटलंय. आता दास केव्हापर्यंत कमबॅक करेल याबाबत माहिती नाही. मात्र दास आता या मोसमात खेळण्यास उपलब्ध होईल, याची शक्यता कमी आहे.

केकेआरने दास याच्यासाठी 50 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात त्याचा समावेश केला होता. दासची ही आयपीएलमध्ये खेळण्याची पहिलीच वेळ होती. दासने या मोसमात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध एकमेव सामना खेळला होता. त्या सामन्यात दासने अवघ्या 4 धावाच केल्या होत्या. तर विकेटकीपिंग करताना 2 स्टंपिग करण्याची संधी गमावली होती. दिल्लीने याच सामन्यात सलग 5 सामन्यानंतर पहिली विजय मिळवला होता. त्यानंतर दासला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नाही.

केकेआरचा वाईट स्थिती

केकेआरला या मोसमात आतापर्यंत अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. केकेआरने आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी 3 सामन्यातच विजय मिळवता आला आहे. केकेआर 6 पॉइंट्ससह सातव्या स्थानी आहे. केकेआर आपला आगामी सामना हा 29 एप्रिल रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध खेळणार आहे.