कोलकाता | आयपीएल 16 व्या हंगामात 33 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विजयी झाली आहे. चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सवर 49 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवलाय. चेन्नईने केकेआरसमोर विनिंगसाठी 236 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. केकेआरच्या काही फलंदाजांनी या आव्हानपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. केकेआरने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 186 धावा केल्या. केकेआरकडून जेसन रॉय याने सर्वाधिक 61 धावांची खेळी केली. तर रिंकू सिंह याने नॉट आऊट 53 रन्स केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला विजयी आव्हानाच्या आसपास जाणाच्या हिशोबाने मोठी खेळी करता आली नाही.
ओपनर एन जगदीशन 1 धावा करुन माघारी परतला. सुनील नारायण याला भोपळाही फोडता आला नाही. वेंकटेश अय्यर याने 20 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन नितीश राणा याने 27 रन्स केल्या. आंद्रे रसेल यानेही निराशा केली. रसेल याने 9 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. डेव्हिड विसे 1 आणि उमेश यादव 4 धावांवर आऊट झाला. चेन्नईकडून तुषार देशपांडे आणि महेश थीक्षणा या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर आकाश सिंह, मोईन अली, रविंद्र जडेजा आणि मथिशा पाथीराणा या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दरम्यान त्याआधी कोलकाताने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. चेन्नईने मिळालेल्या बॅटिंगच्या संधीचा पूर्ण फायदा घेतला. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 4 विकट्स गमावून तब्बल 235 धावा केल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड याने 35 धावांची खेळी केली. तर डेव्हॉन कॉनवे, शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणे या तिघांनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावली. कॉनवे याने 56 आणि शिवम दुबे याने 50 धावा केल्या. तर वनडाऊन आलेल्या अजिंक्य रहाणे याने शेवटपर्यंत नाबाद आणि चेन्नईकडून सर्वाधिक 71 रन्स केल्या.
रहाणे याने केकेआर विरुद्ध मैदानात चौफेर फटकेबाजी केली. रहाणेने अवघ्या 29 बॉलमध्ये 6 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने नाबाद 71 धावा केल्या. तसेच रविंद्र जडेजा याने 18 तर धोनीने नाबाद 2 धावा केल्या. केकेआरकडून कुलवंत खेजोलिया याने 2 विकेट्स घेतल्या. तर वरुण चक्रवर्थी आणि सुयश शर्मा या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅप्टन), एन जगदीशन (विकेटकीपर), जेसन रॉय, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, डेव्हिड विसे, कुलवंत खेजरोलिया, सुयश शर्मा, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | एमएस धोनी (कॅर्णधार आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे आणि महेश तिक्षाना.