मुंबई | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल याला मांडीला झालेल्या दुखापतीमुळे आयपीएल 16 व्या सिजनमधून माघार घ्यावी लागली आहे. इतकंच नाही, तर केएल राहुल याला जून महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधूनही बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे लखनऊ आणि टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. आता लखनऊमध्ये केएल राहुलच्या जागी टीम इंडियाच्या स्टार बॅट्समनची एन्ट्री झाली आहे. या फलंदाजाने टीम इंडियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक ठोकलं होतं.
केएल राहुल याच्या जागी करुण नायर याला संधी देण्यात आली आहे. करुण नायर हा आयपीएल 2023 च्या ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला होता. मात्र आता केएल याच्या दुखापतीनंतर लखनऊ सुपर जायंट्स टीम मॅनेजमेंटने करुण नायर याच्यावर विश्वास दाखवत त्याला टीममध्ये घेतलंय.
करुण नायर याची एन्ट्री
करुण हा आयपीएल 15 व्या सिजनमध्ये राजस्थान रॉयल्स टीमचा भाग होता. तेव्हा करुणला फक्त 3 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. करुणने या 3 सामन्यात अवघ्या 16 धावा केल्या होत्या. राजस्थान टीमने करुणला 1 कोटी 40 लाख रुपये मोजून आपल्या गोटात घेतलं होतं. मात्र त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याला रिलीज केलं. मात्र यानंतर करुणला नशिबाची साथ मिळाली आणि त्याची निवड करण्यात आली.
करुण नायर याने आतापर्यंत एकूण आयपीएलच्या 76 सामन्यांमध्ये 127.75 च्या स्ट्राईक रेटने 1 हजार 496 धावा केल्या आहेत. करुणने आयपीएलमध्ये 10 अर्धशतक ठोकली आहे. करुणने या खेळीत 161 चौकार आणि 39 सिक्स ठोकले आहेत. करुणची 83 ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
दरम्यान करुण नायर हा वीरेंद्र सेहवाग याच्यानंतर टीम इंडियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक ठोकणारा दुसराच फलंदाज आहे. करुणने टीम इंडियाचं 6 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. करुणने या 6 सामन्यांमध्ये 374 धावा केल्या आहेत. त्याचा 303 नॉट आऊट हा हायस्कोअर आहे. करुणनने 2 वनडे मॅचमध्येही टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलंय. तसंच 150 टी 20 मॅचेसमध्ये 2 शतकं आणि 16 अर्धशतकांच्या मदतीने 2 हजार 989 धावा केल्या आहेत.
लखनऊ सुपर जायंट्स टीम | कृणाल पंड्या, (कर्णधार), मनन वोहरा, क्विंटन डी कॉक, आयुष बडोनी, दीपक हुड्डा, कृष्णप्पा गौतम, करण शर्मा,कायले मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, आवेश खान, मार्क वुड, मयंक यादव, मोहसीन खान, रवी बिश्नोई, जयदेव उनाडकट,यश ठाकूर, रोमॅरियो शेफर्ड, निकोलस पूरन, अमित मिश्रा, डॅनियल सॅम्स, प्रेरक मंकड, स्वप्नील सिंग, नवीन उल हक आणि युधवीर सिंग.