मुंबई | आयपीएल स्पर्धेचा 16 वा मोसम जवळ जवळ येतोय, तसंतसं क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला एकामागोमाग अनेक खेळाडू हे दुखापतीचे शिकार होत आहेत. तसंच काही खेळाडूंना आतापर्यंत दुखापतीमुळे या संपूर्ण मोसमाला मुकावं लागलंय. आता त्यात आणखी भर पडली आहे. युवा स्टार खेळाडू दुखापतीचा सामना करावा लागत आहे. हा खेळाडू दुखापतीतून सावरत आहे. त्यात आता हा खेळाडू या पर्वात खेळू शकणार की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे.
या खेळाडूने गेल्या 15 व्या मोसमात आपल्या कामगिरीने छाप सोडली होती. या युवा क्रिकेटरचं नाव मोहसिन खान आहे. मोहसिन लखनऊ सुपर जायंट्सच्या टीममध्ये आहे. मोहसिनच्या खेळण्याबाबत संशय कायम आहे. क्रिकबझनुसार, लखनऊ टीम मॅनेजमेंटकडून कोणताही माहिती देण्यात आलेली नाही. मोहसिनने आतापर्यंत लखनऊकडून खेळलेल्या 9 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र मोहसिन या दुखापतीतून सावरतोय, यामुळे त्याच्या खेळण्याबाबत अस्पष्टता आहे.
मोहसिनने 15 व्या मोसमात पावरप्लेमध्ये बॉलिंग करताना 6 पेक्षा कमी इकॉनमी रेटने धावा दिल्या होत्या. मोहसिनने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्धच्या सामन्यात निर्णायक स्पेल टाकत सर्वोत्तम कामगिरी केली होती. मोहसिनने 16 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या.
दरम्यान लखनऊ सुपर जायंट्स या मोसमातील आपला पहिला सामना हा 1 एप्रिल रोजी खेळणार आहे. या सामन्यात लखनऊ दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध भिडणार आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमात लखनऊने शानदार कामगिरी केली होती. टीमने प्लेऑफमध्ये क्वालिफाय केलं होतं. मात्र ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरली होती. त्यामुळे लखनऊच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.
लखनऊ सुपर जायंट्स टीम | केएल राहुल (कॅप्टन) , क्विंटन डी कॉक, दीपक हु्ड्डा, आयुष बडोनी, कर्ण शर्मा, मनन वोहरा, मयंक यादव, रवि बिश्नोई,मार्कस स्टोइनिस, कृष्णाप्पा गौतम,काइल मायेर्स, क्रुणाल पंड्या, आवेश खान, मार्क वुड, निकोलस पूरन, जयदेव उनादकट, यश ठाकूर, रोमारियो शेफर्ड, अमित मिश्रा, प्रेरक मांकड़, स्वप्निल सिंह, युदवीर सिंह, नवीनउल हक आणि डेनियल सॅम्स.