लखनऊ | आयपीएल 16 व्या हंगामात 15 एप्रिल रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलंय. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिट्ल्सवर विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने आहेत. लखनऊ 3 विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पंजाब किंग्स 4 गुणांसह सहाव्या स्थानी आहे. लखनऊला हा सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी झेप घेण्याची संधी आहे. तर पंजाब किंग्स हा सामना जिंकून पराभवाची हॅटट्रिक टाळण्याचा प्रयत्न करणार आहे. दरम्यान पंजाब विरुद्धच्या सामन्याआधी लखनऊ टीममध्ये घातक गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे.
पंजाब किंग्सने या सामन्यात टॉस जिंकला आहे. या सामन्यात पंजाबचा नियमित कर्णधार शिखर धवन याला दुखापत झाली आहे. त्यामुळे सॅम कुरेन हा नेतृत्व करतोय. सॅमने टॉस जिंकून लखनऊला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. त्यामुळे लखनऊ आपल्या घरच्या मैदानात पंजाबसमोर किती धावांचं आव्हान ठेवतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
लखनऊ सुपर जायंट्ससाठी वाईट बातमी आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादव हा दुखापतीमुळे या मोसमातून बाहेर झाला आहे. त्यामुळे मंयकच्या जागी टीममध्ये हिमाचल प्रदेशचा वेगवान गोलंदाज अर्पित गुलेरिया याचा समावेश करण्यात आला आहे. आयपीएलने ट्विट करत याबाबती माहिती दिली आहे.
लखनऊ फ्रँचायजीने अर्पितसाठी 20 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे. अर्पित याने 15 प्रथम श्रेणी सामन्यात 44, 12 लिस्ट ए मॅचमध्ये 11 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र अर्पित याला पंजाब किंग्स विरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आलेली नाही. मात्र असं असलं तरी अर्पितकडून आगामी सामन्यांमध्ये चांगल्या आणि निर्णायक कामगिरीची आशा लखनऊ फ्रँचायजीला असणार आहे. त्यामुळे अर्पित मयंकच्या जागी मिळालेल्या संधीचं कसं सोनं करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
लखनऊ प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन), कायले मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पांड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बदोनी, आवेश खान, युधवीर सिंग चरक, मार्क वुड आणि रवि बिश्नोई.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | सॅम कुरेन (कर्णधार), अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, सिकंदर रझा, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.