लखनऊ | पंजाब किंग्स टीमने लखनऊ सुपर जायंट्सवर शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या रंगतदार सामन्यात 2 विकेट्सने विजय मिळवला आहे. लखनऊ सुपर जायंट्सने पंजाब किंग्सला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबने हे आव्हान 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं. पंजाबने 19.3 ओव्हरमध्ये 161 धावा केल्या. पंजाबचा हा या मोसमातील तिसरा विजय ठरला. सिकंदर रझा आणि शाहरुख खान या दोघांनी पंजाबच्या विजयात मोठी भूमिका बजावली. सिकंदर रजा याने पंजाबडून सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. तर अखेरच्या क्षणी शाहरुख खान याने नाबाद 23 धावा करत निर्णायक भूमिका पार पाडली.
पंजाबची सलामी जोडी सपशेल अपयशी ठरली. अथर्व तायडे याला भोपळाही फोडता आला नाही. तर प्रभासिमरन सिंह हा 4 धावांवर तंबूत परतला. मॅथ्यू शॉट याने 22 बॉलमध्ये 32 धावांची खेळी केली. हरप्रीत भाटीया याने 22 बॉलमध्ये 22 रन्स केल्या. सिंकदर रझा याने अर्धशतक ठोकलं. रझा याने 57 धावांच्या खेळीत 41 बॉलमध्ये 3 षटकार आणि 4 चौकार ठोकले. तर शाहरुखने 10 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 1 फोरच्या मदतीने नाबाद 23 धावा केल्या.
दरम्यान त्याआधी पंजाबने टॉस जिंकून लखनऊला बॅटिंगसाठी बोलावलं. लखनऊ सुपर जायंट्सने पंजाब किंग्सला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं. लखनऊ सुपर जायंट्सने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. लखनऊला चांगली सुरुवात मिळाली. कॅप्टन केएल राहुल याने या मोसमातील पहिलंवहिलं खणखणीत अर्धशतक ठोकलं. मात्र अखेरीच ज्या फिनिशिंग टचची अपेक्षा होती, तसा टच इतर कोणत्याही फलंदाजाला देता आला नाही.
लखनऊकडून केएल राहुल याने सर्वाधिक 74 धावांची खेळी केली. कायले मेयर्स याने 29 धावा केल्या. कृणाल पंड्या याने 18 तर मार्कस स्टोयनिस याने 15 रन्स केल्या. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर उर्वरित फलंदाजांना दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आलं.
पंजाब किंग्सकडून कॅप्टन सॅम कुरने याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. कगिसो रबाडा याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर हरप्रीत ब्ररार, अर्शदीप सिंह आणि सिकंदर रजा या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
लखनऊ प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन), कायले मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पांड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, आवेश खान, युधवीर सिंग चरक, मार्क वुड आणि रवि बिश्नोई.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | सॅम कुरेन (कर्णधार), अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, सिकंदर रझा, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.