मुंबई : आयपीएल 16 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. मोसमातील पहिला सामना हा 31 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी असलेली मुंबई इंडियन्स आपली पहिली मॅच 2 एप्रिलला खेळणार आहे. या सामन्यात कॅप्टन रोहित शर्माची ‘पलटण’ बंगळुरुविरुद्ध भिडणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या 16 व्या मोसमाच्या निमित्ताने नेटकऱ्यांना सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
अर्जुनला 2 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हनमध्ये अर्थात पदार्पणाची संधी देणार का, असा सवाल सोशल मीडियावर नेटकरी विचारत आहे. मुंबईने अर्जुनला 2021 मध्ये 20 लाख रुपये या बेस प्राईजमध्ये खरेदी करुन आपल्या ताफ्यात घेतलं होतं.
अर्जुनसाठी 2022 मध्ये मुंबईने अधिकचे 10 लाख मोजून त्याला 30 लाख रुपयांमध्ये खरेदी केलं. मात्र त्याला काही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी दिली नाही. त्यामुळे अर्जुनच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. जर घ्याचंच नाही, तर मग घेता कशाला, अशा शब्दात नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता.
आता पुन्हा काही दिवसांनी आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. त्याआधी अर्जुनची चर्चा पुन्हा रंगली आहे. दरम्यानच्या काळात अर्जुनने देशांतर्गत स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली.
अर्जुन आतापर्यंत फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए प्रकारात 7 तर 9 टी 20 सामने खेळला आहे. अर्जुनने 7 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 223 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतकाचा समावेश आहे. अर्जुनची 120 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच त्याने 12 विकेट्स घेतल्यात.
तसेच 7 लिस्ट ए सामन्यातील 3 डावात अर्जुनने 25 धावा केल्यात, तर 8 विकेट्स घेतल्यात. सोबत 9 टी 20 मॅचमध्ये अर्जुनने 12 विकेट्स घेतल्या आहेत. तर 20 धावाही केल्या आहेत.
अर्जुन बॅटिंगसोबत बॉलिंगही करतो. मुंबई इंडियन्सने गेल्या 2 वर्षात सचिनचा नेट्समध्येच मजबूत वापर केला आहे. त्यामुळे आता टीम मॅनेजमेंट पृथ्वीवर विश्वास दाखवत पदार्पणाची संधी देणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह.