मुंबई | आयपीएल 16 व्या हंगामातील 12 व्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या सामन्यात दोन दिग्गज संघ आणि 2 अनुभवी आणि यशस्वी कर्णधार आमनेसामने भिडणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज 8 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात मॅच होणार आहे. हा सामना थेट रोहित शर्मा विरुद्ध महेंद्रसिंह धोनी असा रंगणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये या सामन्यासाठी इतर सामन्यांच्या तुलनेत बरीचशी उत्सुकता आहे. या सामन्याची भुरळ फक्त क्रिकेट चाहत्यांनाच आहे, अशातला भाग नाही. लाखो दिलो की धडकन असलेली डान्सर गौतमी पाटील हीला ही या सामन्याची भुरळ पडली आहे. गौतमीने चेन्नई आणि मुंबईपैकी आपला आवडता संघ कोणता याबाबत माहिती दिली आहे.
गौतमी पाटीलने आपल्या डान्सने सोशल मीडियावर आणि सर्वत्रच हवा पसरवली आहे. गौतमीच्या लाईव्ह शो दरम्यान तिची एक झळक पाहण्यासाठी चाहते वाटेल ते करण्यासाठी तयार असतात. गौतमीच्या आतापर्यंत झालेल्या अनेक कार्यक्रमांमध्ये तिच्या चाहत्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला आहे. गौतमीची वाढती प्रसिद्धी पाहता तिला टार्गेटही करण्यात आलंय. यावरुन गौतमी यशाच्या शिखरावर असल्याचं दिसून येतं.
काही दिवसांपूर्वी गौतमीला एका मुलाखतीत एकूण 2 प्रश्न विचारण्यात आले होते. तुझा आवडता क्रिकेटर कोण, विराट कोहली की महेंद्रसिंह धोनी? आाणि दुसरा प्रश्न म्हणजे आयपीएलमधील तुझी आवडती टीम कोणती, मुंबई इंडियन्स की चेन्नई सुपर किंग्स? गौतमीने या प्रश्नांची हुशारीने उत्तरं दिली.
गौतमीला दोन्ही प्रश्नांसाठी प्रत्येकी 2 पर्याय देण्यात आले होते. गौतमीने आवडता क्रिकेटर म्हणून महेंद्रसिंह धोनीला पसंती दिली.तर आयपीएलमधील आवडती टीम म्हणून तिने मुंबई इंडियन्सच्या नावावर शिक्कामोर्तब केला. गौतमीने एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिला खाण्यापिण्यापासून, आवडीनिवडींपर्यंत अनेक प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची तिने दिलखुलासपणे उत्तरं दिली.
दरम्यान मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यातील या सामन्याकडे कोटी क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. ही लढाई हिटमॅन अर्थात रोहित शर्मा आणि थाला म्हणजेच महेंद्रसिंह धोनी यांच्यात असणार आहे. दोन्हीही आयपीएलमधील यशस्वी कॅप्टन्स आहेत. दोघांचाही कर्णधार म्हणून तगडा अनुभव आहे. त्यामुळे मुंबई विरुद्ध चेन्नई या सामन्यात नक्की कोण बाजी मारणार, हे पाहणं उत्कंठावर्धक ठरणार आहे.