मुंबई | मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर थोड्याच वेळात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध यांच्यातील सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ हे स्टेडियममध्ये दाखल झाले आहेत. तसेच क्रिकेट चाहतेही हळुहळु स्टेडियमच्या दिशेने जात आहेत. मुंबईचा या मोसमातील हा होम ग्राउंडवरील पहिलाच सामना आहे. तसेच मुंबईला पहिल्या सामन्यात आरसीबीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यामुळे मुंबई आपल्या घरच्या मैदानात चेन्नईला पराभूत करुन पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
दोन्ही संघांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी नेट्समध्ये घाम गाळलाय. मात्र दोन्ही संघातील प्रत्येकी 1 खेळाडू हा दुखापतीने त्रस्त असल्याचं समोर आलं आहे. मुंबईचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि चेन्नईचा ऑलराउंडर बेन स्टोक्स या दोघांना दुखापत झाली आहे. त्यामुळे या दोघांना या सामन्यात खेळता येणार नसल्याती भीती व्यक्त केली जात आहे. जोफ्राच्या दुखापतीमुळे मुंबईच्या चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. मात्र त्यानंतर एक अशी बातमी समोर आली, की ज्यामुळे जोफ्राची दुखापत सर्व विसरून गेले.
आयपीएलच्या या मोसमात जिओ एपवर एकूण 12 भाषांमध्ये कमेंट्री केली जाते. यामध्ये मराठी भाषेचाही समावेश आहे. आतापर्यंत या मोसमाच्या सुरुवातीपासून अनेक दिग्गजांनी मराठीत समालोचन केलं आहे. चेन्नई विरुद्धच्या या सामन्यासाठी टीम इंडियाचा वर्ल्ड कप विजेत्या संघाचा खेळाडू हा मराठीत कमेंट्री करणार आहे. या दिग्गज खेळाडूने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
जिओ सिनेमा एपवर टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज ‘श्रीरामपूर एक्सप्रेस’अशी ओळख असलेला झहीर खान हा आपल्या मराठीत कमेंट्री करणार आहे. झहीरने इंस्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे.
“मुंबई आपल्या घरातला या मोसमात पहिला सामना खेळतेय. मी असणार आहे मराठी कमेंट्रीवर. मी तुम्हाला भेटणार आहे मुंबई आणि चेन्नईचा सामना सुरु झाल्यावर. तर मग तिथे भेटुयात. मला नक्की सांगा की माझी मराठी कमेंट्री तुम्हाला कशी वाटली”, असं झहीरने या व्हीडिओत आपल्या चाहत्यांना सांगितलंय.
झहीर खान करणार मराठी कमेंट्री
झहीरच्या या व्हीडिओवर वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी यानेही कमेंट केलीय. “या सर लवकर, वाट बघतोय”, अशी कमेंट धवल कुलकर्णी याने केलीय.
आयपीएलमध्ये एका मोसमामध्ये प्रत्येक संघ एका टीमविरुद्ध एकूण 2 वेळा भिडतं. मात्र मुंबई आणि चेन्नई यांचं नातं या पलीकडचं आहे. साखळी फेरी व्यतिरिक्त मुंबई-चेन्नई अनेकदा फायनलमध्येही भिडले आहेत.
आतापर्यंत उभयसंघांमध्ये एकूण 34 वेळा आमनासामना झाला आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सचा बोलबाला राहिला आहे. मुंबईने 34 पैकी 20 सामन्यांमध्ये चेन्नईवर विजय मिळवला आहे. तर उर्वरित 14 मॅचमध्ये चेन्नईने बाजी मारली आहे. मात्र या दोन्ही संघातील सामन्याचा अंदाज हा आकड्यांवरुन बांधणं चुकीच ठरेल, कारण दोन्ही संघात मॅचविनर खेळाडू आहेत. जे कधीही सामना एकहाती फिरवण्याची क्षमता ठेवतात.
मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि संदीप वॉरियर.
टीम सीएसके | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.