मुंबई | तेंडुलकर कुटुंबियांसाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक ठरला. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला गेल्या 2 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर मुंबई इंडियन्सकडून पदार्पणाची संधी मिळाली. अर्जुनने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यातून आयपीएल कारकीर्दीची सुरुवात केली. अर्जुनने कोलकाताच्या डावातील पहिली ओव्हरही टाकली. अंजली, सचिन आणि सारा या तिघांनी आपल्या लेकाला-भावाला पहिल्या सामन्यात चिअरअप करण्यासाठी हजेरीही लावली. योगायोग म्हणा किंवा आणखी काही, सचिन ज्या स्टेडियममध्ये क्रिकेटचे असंख्य सामने खेळला, जिथे आपला कारकीर्दीतील 200 वा कसोटी सामना खेळला, वर्ल्ड कप जिंकला त्याच स्टेडियममध्ये अर्जुनने आयपीएल पदार्पण केलं. त्यामुळे अर्जुनचं पदार्पण हे सचिनसाठी एक क्रिकेटर आणि बाप म्हणून कायम लक्षात राहिल. अर्जुनच्या या पदार्पणानंतर सचिनने ट्विट केलं आहे.
अर्जुनने आयपीएल पदार्पण करताच अनोखा विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे. आयपीएलच्या इतिहासात बाप-बेट्याची जोडी खेळल्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. सचिन तेंडुलकर याने याआधी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व आणि नेतृत्वही केलं आहे. सचिनने एकूण 78 सामन्यांमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व केलं आहे. मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा 2013 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. या ऐतिहासिक विजयासह सचिनने आयपीएलला रामराम केला होता. त्यानंतर आता तब्बल 10 वर्षांनी अर्जुन क्रिकेटमध्ये परतला आहे.
सचिन तेंडुलकर याने लेकाच्या पदार्पणानंतर ट्विट करत मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. “अर्जुन, आज तू क्रिकेटपटू म्हणून तुझ्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहेस.तुझा वडील या नात्याने, तुमच्यावर प्रेम करणारे आणि खेळाबद्दल उत्कट प्रेम करणारे, मला माहित आहे की तु खेळाला योग्य तो आदर देत राहशील आणि क्रिकेटकडूनही तुला तसाच आदर मिळेल”, अशी आशा सचिनने व्यक्त केली.
“तु इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मला खात्री आहे की तु अशीच मेहनत करत राहशील. एका सुंदर प्रवासाची ही सुरुवात आहे. ऑल द बेस्ट”, अशा शब्दात सचिनने लेकाला क्रिकेटमधील नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
You have worked very hard to reach here, and I am sure you will continue to do so. This is the start of a beautiful journey. All the best! ?? (2/2)
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 16, 2023
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), इशान किशन, कॅमरन ग्रीन, टिळक वर्मा, नेहल वढेरा, टिम डेविड, अर्जुन तेंडुलकर ऋतिक शौकीन, पियूष चावला, रिले मेरेडिथ आणि ड्वेन जॉनसन.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, नारायण जगदीशन, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा.