मुंबई : मुंबई इंडिअन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबई संघाने हा सामना 6 विकेट्सने जिंकला आहे. आरसीबी संघाने मुंबईला 200 धावांचं लक्ष्य दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादव याने सर्वाधिक 83 धावांची खेळी केली. त्यासोबतच नेहल वढेरा याने नाबाद 52 धावांची खेळी करत विनिंग शॉट मारत संघाला विजय मिळवून दिला. मुंबई संघाने हे आव्हान 6 विकेट्स आणि 21 चेंडू राखून विजय मिळवला.
या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरूवात एकदम दमदार झाली होती. इशान किशन याने एकट्याने आरसीबीच्या गोलंदाजांना धुवून काढलं. 200 च्या स्ट्राईक रेटने त्याने 21 चेंडूत 42 धावा करत विजयाचा पाया रचला होता. मात्र वानिंदु हसरंगाने एकाच ओव्हरमध्ये रोहित शर्मा 7 धावा आणि इशान किशन यांना आऊट केलं. या दोन विकेटमुळे सामना फिरेल असं वाटलं होतं.
सूर्यकुमार आला आणि त्याने आपला शो सुरू केला. सूर्या आधी सावध खेळला मात्र एकदा सेट झा्ल्यावर त्याने आपला खरा खेळ दाखवला. सूर्याने अवघ्या 35 चेंडूत 83 धावांची खेळी केली यामध्ये 6 षटकार आणि 7 चौकार मारले. सूर्याने चार अर्धशतके केली आहेत आणि सर्व चेस करताना आली आहेत.
पहिल्याच ओव्हरमध्ये नेहल वढेराने फाफ डू प्लेसिस याचा कॅच सोडला होता. त्यानंतर जेसन बेहरेनडॉर्फला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विराट कोहली कॅच आऊट झाला. 1 धावा काढून तो माघारी परतला, इशान किशनने त्याचा कॅच घेतला. जेसन बेहरेनडॉर्फच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये अनुज रावतने अतरंगी फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काही यशस्वी झाला नाही. 6 धावांवर तो आऊट झाला. त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डू प्लेसिस यांनी मुंबईच्या गोलंदाजाना धुवून काढलं
ग्लेन मॅक्सवेल याने 68 धावांची खेळी केली यामध्ये त्याने 8 चौकार आणि 4 षटकार मारले. तर फाफ ने 41 चेंडूत 65 धावा केल्या. यामध्ये त्याने 5 चौकार आणि 3 षटकार मारले. दोघे बाद झाल्यावर खेळायला आलेल्या दिनेश कार्तिक आणि केदार जाधव यांनी संघाला 199 पर्यंत पोहोचवलं.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), इशान किशन (W), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (W), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, विजयकुमार विशक, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड