मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात रोमांचक सामना क्रीडाप्रेमींना बघायला मिळाला. शेवटच्या कोण बाजी मारणार? अशी धाकधूक लागली असताना टिम डेविड नावाचं वादळ घोंगावलं आणि मुंबईला विजय मिळवून दिला. टिम डेविने 14 चेंडूत नाबाद 45 धावांची खेळी केली आणि राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा घास हिरावून घेतला. शेवटच्या षटकात 17 धावांची आवश्यकता असताना टिम डेविडने सलग तीन षटकार ठोकले आणि सामना जिंकवला. त्याच्या विजयी खेळीनंतर टिम डेविडने सहज असे षटकार कसे ठोकले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गोलंदाजाची एक चूक आणि टिम डेविडचा उत्तुंग षटकार असं कसं होतं ते जाणून घ्या.
आयुष्याचं यशाचं गणित कायम तसंच राहात नाही. कधी कधी अपयशही पचवावं लागतं. असं काहीसं टिम डेविडच्या बाबतीत घडलं आहे. सहा वर्ष अपयश पचवत टिम डेविड एक वेगळंच व्यक्तिमत्त्व म्हणून समोर आले आहे. टिम डेविडने सिक्स मशीन म्हणून प्रसिद्धी मिळवण्यामागेही एक खास कारण आहे.
टिम डेविडला आजपासून चार वर्षापूर्वी म्हणजेच 2019 मध्ये वेदना सहन कराव्या लागल्या होत्या. टिम डेविड वेस्टर्न ऑस्ट्रेलियासाठी खेळत होता. पण चार वर्षापूर्वी त्याचा कॉन्ट्रॅक्ट वाढवण्यात आला नाही. कारण त्याचं कामगिरी हवी तशी नव्हती. तसेच 2019 पूर्वी तो दुखापतग्रस्त होता. त्यामुळे त्याला अतीव दु:ख झालं. त्यानंतर पुनरागमन करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.
टिम डेविडेने आपल्या फलंदाजीत काही बदल केले. 2019 मध्ये हिवाळ्यापासून त्याने हा बदल करण्यास सुरुवात केली. अमेरिकन गोल्फर डेंचब्यूला पाहात त्याने गोल्फ स्विंग कॉपी करण्यास सुरुवात केली. ब्रायसन डेचंब्यू गोल्फच्या इतिहासातील सर्वात जबरदस्त शॉट मारणारा खेळाडू आहे. त्याचा स्विंग जबरदस्त आहे. त्याने 2020 मध्ये यूएस ओपन किताब जिंकला होता.
टिम डेविडने डेचंब्यू प्रमाणे आपली बॅट फिरवण्यास सुरुवात केली.हा सराव करता करता त्याला लय सापडली. डेविडच्या डोक्यात फक्त चेंडू सीमापार पोहोचवणं इतकंच होतं. गोल्फर ब्रायसन डेचंब्यूच्या स्टाईलचा टिम डेविडला फायदा झाला. तशा पद्धतीने केलेल्या फटकेबाजीमुळे चेंडू 10 ते 20 मीटर लांब जाऊ लागला.
तसेच यासाठी चेंडू बॅटच्या मधोमध लागण्याची काहीही गरज भासत नव्हती. फक्त बॅट जोरात फिरवली की चेंडू मध्ये लागो या ना लागो चेंडू थेट सीमारेषेपार जात होता. टिम डेविडने यात काही बदल केले. इतकंच काय तर सिंगापूरसाठी खेळणाऱ्या टिम डेविडचा ऑस्ट्रेलियाने टी 20 वर्ल्डकप 2022 मध्ये समावेश केला. आता टीम डेविड आपल्या फलंदाजीने सर्वांच लक्ष वेधून घेत आहे.