मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात आज 21 मे रोजी 2 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. तर दुसरा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पार पडणार आहे. पहिला सामना हा मुंबईसाठी आणि दुसरा सामना हा आरसीबीसाठी आरपारचा आहे. कारण, मुंबई आणि आरसीबी या दोघांपैकी एका संघालाच प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. त्यामुळे प्लेऑफच्या एका जागेसाठी या दोन्ही टीममध्ये रस्सीखेच आहे.
तर दुसऱ्या बाजूला राजस्थान रॉयल्स टीमलाही प्लेऑफची शक्यता आहे. मात्र राजस्थानची शक्यता मुंबई आरसीबीच्या तुलनेत कमी आहे. मात्र यानंतरही राजस्थान प्लेऑफमध्ये पोहचणारी टीम ठरु शकते, कसं ते आपण जाणून घेऊयात.
गुजरात टायटन्स या हंगामात प्लेऑफमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली. त्यानंतर शनिवारी 20 मे रोजी चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिट्ल्सला पराभूत करत प्लेऑफमध्ये धडक दिली. तर दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने केकेआर विरुद्ध 1 धावेने विजय मिळवत धडक मारली. त्यामुळे आता प्लेऑफच्या शर्यतीत 3 टीम ठरल्यात . तर एका जागेसाठी ही झुंज सुरु आहे. यातून राजस्थान प्लेऑफमध्ये कशी पोहचू शकते, हे पाहुयात
सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवायला हवा. तर दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 6 धावांनी धुव्वा उडवला,तर राजस्थान प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरेल.
राजस्थानसाठी प्लेऑफमध्ये पोहचण्याचं समीकरण निश्चितचं सोपं नाही. तसेच हे समीकरण जर तरवर आधारलेलं आहे. यामुळे राजस्थानच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता फारच कमी आहे. मात्र क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. जोवर सामन्यातील शेवटचा बॉल टाकला जात नाही, तोवर काहीही होऊ शकतं.
क्रिकेटमध्ये अनेक उलटफेर झालेले पाहिले आहेत. त्यामुळे राजस्थानसाठी अजूनही प्लेऑफच्या आशा कायम आहेत. आता प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी टीम कोणती, याचं उत्तर लवकरच क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहे. दरम्यान प्लेऑफ क्वालिफायर 1 मॅच ही गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. या पैकी जिंकणारी टीम थेट फायनलला पोहचेल. तर पराभूत टीम क्वालिफायर 2 मध्ये एलिमिनेटर जिंकून येणाऱ्या टीम विरुद्ध भिडेल.
त्याआधी एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्ससमोर राजस्थान, आरसीबी आणि मुंबई या तिघांपैकी कोणतीही एक टीम खेळेल. एलिमिनेटर सामना जिंकणारी टीम क्वालिफायर 2 सामना खेळेल. या सामन्यात क्वालिफाय 1 मध्ये पराभूत झालेली टीम एलिमिनेटरमध्ये जिंकलेल्या संघाविरुद्ध खेळेल. तर त्यानंतर क्वालिफायर 2 मध्ये जिंकणारी टीम थेट अंतिम सामन्यात पोहचेल. हा अंतिम सामना 28 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.
पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या 2 स्पॉटवर असलेल्या संघांना प्लेऑफमध्ये पोहचल्यानंतर फायनलमध्ये पोहचण्यासाठी 2 संधी मिळतात. त्यामुळे बहुतांश संघांचा हा पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या 2 क्रमांकावर राहण्याचा प्रयत्न असतो.