मुंबई : आयपीएल स्पर्धा आता दिवसागणिक रंगतदार वळणावर येत आहे. कारण प्रत्येक दिवसाला होणाऱ्या सामन्यामुळे गुणतालिकेचं गणित झपाट्याने बदलत आहे. आज कोणता संघ टॉपला असेल तर दुसऱ्या दिवशी दुसराच संघ तिथे पोहोचलेला असतो. मागचे तीन सामने तर शेवटच्या चेंडूपर्यंत रंगल्याचं पाहायला मिळालं. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हा सामनाही अतितटीचा झाला. हा सामना राजस्थाननं अवघ्या 3 धावांनी जिंकला. मात्र सामन्यातील एका निर्णयामुळे सध्या वादाला तोंड फुटलं आहे. कारण या सामन्यात पंचांनी दव पडल्यामुळे स्वत:च चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे फिरकीपटू आर. अश्विनने आश्चर्य व्यक्त केलं आहे.
फिरकीपटू आर. अश्विननं या सामन्यात 25 धावा देऊन दोन गडी बाद केले. पण दुसऱ्या डावात चेंडू बदल्याने आर. अश्विनने सांगितलं की, “मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की, दव पडल्यामुळे पंचांनी स्वत:च चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला.”
“यापूर्वी असं कधी झालं नाही, त्यामुळे त्याचं आश्चर्य वाटलं. खरं सांगायचं तर आयपीएलमध्ये मैदानात घेतल्या जाणाऱ्या काही निर्णयामुळे मी आश्चर्यचकीत आहे. कारण यामुळे चांगले वाईट परिणाम होऊ शकता. त्यामुळे संतुलन ठेवणं गरजेचं आहे.”, असं आर. अश्विनने सांगितलं.
“आमचा संघ गोलंदाजी करत होता आणि आम्ही चेंडू बदलण्यास सांगितलं नव्हतं. मात्र पंचांना स्वत:च्या मर्जीने चेंडू बदलला. मी पंचांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही असं करू शकतो”, असं आर. अश्विनने पुढे सांगितलं.
“मला असं वाटतं की जेव्हा दव पडत असेल तेव्हा ते चेंडू बदलू शकतात. तुम्हाला जे वाटेल ते करू शकता. पण यासाठी एक मानक असणं गरजेचं आहे. ” असंही आर. अश्विनने पुढे सांगितलं.
दुसरीकडे, या सामन्यात आर. अश्विन आणि अजिंक्य रहाणे यांच्यातील नजरेची भाषा बरंच काही सांगत होती. आर. अश्विननं मंकडिंग स्टाईलप्रमाणे अॅक्शन करत चेंडू डेड केला. त्यानंतर अजिंक्य रहाणेनं तशाच पद्धतीने बॉल सोडत डेड केला. दुसऱ्या चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकला. त्यामुळे दोघांनी एकमेकांकडे वेगळ्याच नजरेनं पाहीलं.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन) : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, कुलदीप सेन, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन) : डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (w/c), सिसांडा मगला, महेश थेक्षाना, तुषार देशपांडे, आकाश सिंग