बंगळुरु | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार फलंदाज विराट कोहली याने आपल्या घरच्या मैदानात एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध शानदार अर्धशतक ठोकलं आहे. विराट कोहली याने 35 बॉलमध्ये हे अर्धशतक पूर्ण केलं. विराटचं हे या मोसमातील एकूण दुसरं अर्धशतक ठरलं. तर विराटच्या आयपीएल कारकीर्दीतील 46 वं अर्धशतक ठरलं. विशेष म्हणजे आरसीबी विरुद्ध लखनऊ यांच्यातील हा तिसरा सामना आहे. विराटचं लखनऊ विरुद्धचं हे पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं. विराटने या अर्धशतकी खेळीत चौकार आणि षटकार ठोकले.
तसेच विराटने आयपीएल इतिहासात सर्वच संघांविरुद्ध सर्वाधिक अर्धशतक करण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला. विराट डेव्हिड वॉर्नरला मागे टाकत आयपीएलमध्ये 13 संघांविरुद्ध अर्धशतक ठोकण्याचा कारनामा केला आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 14 संघ खेळले आहेत. यापैकी विराटने तत्कालिन कोची टुस्कर्स केरळचा अपवाद वगळता सर्व संघांविरुद्ध अर्धशतकं ठोकली आहेत.
Second half-century of the season for @imVkohli ?
He's enjoying his time with the bat here in Bengaluru ??
Follow the match ▶️ https://t.co/76LlGgKZaq#TATAIPL | #RCBvLSG pic.twitter.com/8BEE0rDvXu
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2023
विराट कोहली याने या अर्धशतकासह टी 20 क्रिकेटमध्ये एकाच मैदानात सर्वाधिक अर्धशतकाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. विराटचं एम चिन्नास्वामी स्टेडियममधील हे 24 वं अर्धशतक ठरलं आहे. विराटने यासह एलेक्स हेल्सच्या विक्रमाची बरोबरी साधली. एलेक्स हेल्स याने ट्रेन्ट ब्रिजमध्ये 24 अर्धशतकं केली आहेत.
विराट कोहली याच्याकडून अर्धशतकानंतर मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र विराट या अर्धशतकाचं रुपांतर मोठ्या खेळीत करण्यात अपयशी ठरला. विराट कोहली 61 धावांवर अमित मिश्रा याच्या बॉलिंगवर कॅच आऊट झाला. मार्क्स स्टोयनिस याने विराटचा कॅच घेतला. विराटने 44 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 4 चौकारांच्या मदतीने 61 धावांची खेळी केली.
दरम्यान विराट कोहली या अर्धशतकी खेळीसह ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. विराटने मुंबई इंडियन्स विरुद्ध 82, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 21 आणि लखनऊ विरुद्ध 61 अशा प्रकारे एकूण 164 धावा केल्या आहेत. विराट यासह ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीत शिखर धवन, ऋतुराज गायकवाड याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | के एल राहुल (कॅप्टन), कायले मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्क्स स्टॉयनिस, कृणाल पंड्या, अमित मिश्रा, रवी बिश्नोई, ए खान, जयदेव उनाडकट आणि मार्क वुड.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), एस अहमद, ए रावत, एच पटेल, डेव्हिड विली, मोहम्मद सिराज आणि वेन पारनेल.