मुंबई : आयपीएलच्या 16 व्या मोसमासाठी आणि वूमन्स प्रिमियर लीगसाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएल आणि वूमन्स आयपीएलचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाऊ शकतं. वूमन्स प्रिमियर लीगच्या पहिल्या हंगामाचं आयोजन हे 4 मार्चपासून केलं जाऊ शकतं. तर आयपीएलच्या 16 व्या मोसमाची सुरुवात 31 मार्चपासून होऊ शकते.
वूमन्स आयपीएलच्या पहिल्या हंगामात एकूण 5 संघात ट्रॉफीसाठी लढत होणार आहे. सध्या तरी 5 संघांचीच निवड करण्यात आली आहे. यामध्ये अहमदाबाद आणि बंगळुरु या संघांना खरेदी केलं आहे.
वूमन्स आयपीएलचं पहिलाच मोसम आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. क्रिकइंफोच्या माहितीनुसार, महिला आयपीएलची सुरुवात 4 मार्चपासून होऊ शकते. तर अंतिम सामना 24 मार्चला खेळवण्यात येईल. यानंतर आयपीएलच्या 16 व्या मोसमाचं आयोजन केलं जाईल.
रिपोर्टनुसार, आयपीएलचं आयोजन हे 31 मार्च किंवा 1 एप्रिलला केलं जाऊ शकतं. आयपीएलच्या 16 व्या मोसमातील अंतिम सामना 28 मे रोजी खेळवण्यात येऊ शकतो. आयपीएलच्या 16 व्या मोसमाबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र याबाबतची घोषणा लवकरच होऊ शकते.
बुधवारी वूमन्स आयपीएलमधील 5 टीमसाठी मोठ्या कंपन्यांकडून बोली लावण्यात आली. यामध्ये अडाणी ग्रुपने सर्वाधिक 1 हजार 289 कोटी रुपयांची उच्चांकी बोली लावली. अडाणी समूहाने अहमदाबाद टीम खरेदी केली.
विन स्पोर्ट्सने मुंबई टीमसाठी 912.99 कोटी मोजले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमला 901 कोटी रुपयात खरेदी केलं. तर जेएसडबल्यू जीएमआर क्रिकेट प्रायव्हेटने दिल्ली टीमसाठी 810 कोटी मोजले. तर लखनऊसाठी काप्री ग्लोबल होल्डिंग्सने 757 खर्च केले.
दरम्यान 23 डिसेंबर 2022 ला आयपीएलसाठी मिनी ऑक्शन पार पडलं. प्रत्येक फ्रँचायजीने आपल्यानुसार खेळाडूंची निवड केली. आता या 16 व्या मोसमाचं आणि महिला आयपीएलचं वेळापत्रक केव्हा जाहीर होतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.