मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात आतापर्यंत झालेल्या 21 सामन्यात क्रिकेट चाहत्यांना थरार अनुभवयाला मिळाला. दररोज होणाऱ्या सामन्यांमध्ये क्रिकेटप्रेमींना रोमांच पाहायला मिळतोय. आतापर्यंत अनेक सामन्यांचा निकाल हा शेवटच्या बॉलवर लागला, यामुळे क्रिकेट चाहत्यांचाही पैसावसूल झाला. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील 22 वा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. हा सामना थेट महेंद्रसिंह धोनी विरुद्ध विराट कोहली असा आहे. त्यामुळे या काँटे की टक्करमध्ये कोण बाजी मारणार,याकडे क्रीडा विश्वाचं लक्ष असणार आहे. या दरम्यान क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या 16 व्या मोसमानंतर भारतीय क्रिकेटपटू हा निवृत्ती घेणार असल्याची माहिती त्या खेळाडूच्या जवळच्या व्यक्तीने दिली आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा आयपीएल 16 व्या सिजन हा अखेरचा असेल असा दावा माध्यमांनी नाही, तर त्याच्या जवळच्या आणि सोबत खेळलेल्या लाडक्या केदार जाधव याने केला आहे. केदारच्या या दाव्यामुळे धोनी चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. मात्र धोनीची बॅटिंग पाहता तो 42 वर्षांचा असून निवृत्त होण्याची गरज आहे, असं क्रिकेट चाहत्यांना वाटत नाही.
केदार धोनीसोबत टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळला आहे. केदार हा धोनीच्या जवळचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. केदारने जिओ सिनेमासोबत बोलताना धोनीच्या निवृत्तीबाबतचा दावा केला.
“मी 200 टक्के विश्वासाने सांगतो की महेंद्रसिंह धोनी हा एक खेळाडू म्हणून आयपीएलचा अखेरचा हंगाम खेळतोय. धोनी येत्या जुलै महिन्यात 42 वर्षांचा होईल. धोनी स्वत:ला कायम फिट ठेवतो. मात्र धोनी एक माणूसच आहे. धोनीचा हा अखेरचा सिजन असणार आहे”, असं केदारने स्पष्ट केलं.
केदारच्या दाव्यानुसार, जर धोनी निवृत्त झाला तर चेन्नई सुपर किंग्सची धुरा कोण सांभाळणार? सीएसकेच्या कॅप्टन्सीसाठी अनेक नाव चर्चेत आहेत. मात्र कर्णधारपदाच्या शर्यतीत मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड आणि ऑलराउंडर रविंद्र जडेजा दोघांची नावं आघाडीवर आहेत. त्यामुळे आता केदारने केलेला दावा कितपत खरा ठरतो, हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच.