मुंबई | विराट कोहली, टीम इंडियाचा माजी कर्णधार. विराट कोहली मैदानात कायम आक्रमक आणि संतापलेला दिसून येतो. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स यांच्यात 1 मे रोजी सामना पार पडला. या सामन्यादरम्यान विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा नवीन उल हक यांच्यात झकाझकी झाली. त्यानंतर या वादात गौतम गंभीर याची एन्ट्री झाली. नवीन उल हक याच्यामुळे 10 वर्षांनी गंभीर आणि विराट पुन्हा भिडले. दोघांमध्ये शाब्दिक हाणामारी झाली.
सुदैवाने सहकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने या दोघांमधील वाद शमला. या सर्व प्रकारानंतर सोशल मीडियावर खूप चर्चा रंगल्या. दरम्यान आता आयपीएल शेवटच्या टप्प्यात आहे. या दरम्यान विराट कोहली याने हो माझी चूक झाली, असं म्हटल्याने एकच खळबळ उडाली आहे. विराट नक्की कशाबाबत चूक झाल्याचं म्हणाला हे आपण समजून घेऊयात.
विराट कोहली याने टीम इंडियाचं नेतृत्व केलं. मात्र त्याला आपल्या कॅप्टन्सीत टीम इंडियाला आयसीसी ट्रॉफी जिंकून देता आली नाही. पण याच विराटने आपल्या कॅप्टन्सीत टीम इंडियाला कसोटीमध्ये अव्वल स्थानी आणलं. ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात घरात पराभूत केलं. कोहलीवर सातत्याने त्याच्या नेतृत्वावरुन टीका करण्यात आली. आता यावरुन विराटने प्रतिक्रिया दिली आहे.
विराटने कसोटीमध्ये 2014 आणि टी 20 मध्ये 2017 साली कर्णधारपदाची सूत्र स्वीकारली. मात्र आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला आयसीसी ट्रॉफी जिंकून न देणं हे विराटला जमलं नाही. आता अखेर विराटने आपल्या कर्णधारपदाबाबत मौन सोडलंय.
विराटने प्यूमाच्या एका डॉक्येमेंट्री सीरिजमध्ये कर्णधारपदाबाबत मोठं विधान केलंय. कॅप्टन म्हणून माझ्याकडू काही चूक झाली. मात्र मी कधीच वैयक्तिक स्वार्थासाठी काही केलं नाही. तसेच कर्णधारपदाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत कधीच स्वार्थासाठी कोणतेही निर्णय घेतले नाहीत. टीमला पुढे घेऊन जाणं हेच माझं ध्येय होतं, असं विराटने प्यूमाच्या डॉक्युमेंट्रीमध्ये स्पष्ट केलं.
माणूस चूक करतो. अपयश येतच राहतं. मात्र माझा उद्देश कधी चुकीचा नव्हता. माणूस चूक करचो आणि त्यातूनच शिकतो, असंही विराटने सांगितलं. या अशा गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात. तुम्ही घेतलेले काही निर्णय अचूक ठरतात तर काही चूकतात. आपण प्रत्येक परिस्थितीतून शिकतो,असंही विराटने याने स्पष्ट केलं.