मुंबई | आयपीएल 17 व्या मोसमाचा माहोल तयार झाला आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. निवडणुकांमुळे 17 व्या हंगामातील फक्त पहिल्या 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान एकूण 3 डबल हेडरसह 21 सामने पार पडणार आहेत. त्याआधी एक एक करुन अनेक खेळाडू आपल्या टीमसोबत जोडले जात आहेत. या 17 व्या हंगामानिमित्ताने आपण 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्स टीमची पडती बाजू जाणून घेणार आहोत.
मुंबई इंडियन्समध्ये काही वर्षांपूर्वी कृणाल पंड्या आणि कायरन पोलार्ड यासारखे अष्टपैलू होते. मात्र कृणाल लखनऊ सुपर जायंट्स टीममध्ये गेला. तर पोलार्डने याआधीच निवृत्ती घेतली. यंदा मुंबईमध्ये ऑलराउंडर्स खेळाडू नाहीत अशातला भाग नाही. मात्र ते पोलार्डसारखे तोडीसतोड नाही हे निश्चित. त्यामुळे मुंबईला यंदा निश्चितच अष्टपैलू खेळाडूंची उणीव भासणार हे नक्की.
एक ऑलराउंडर हा किमान बॅटिंग आणि बॉलिंग अशा दोन्ही जबाबदाऱ्या सार्थपणे पार पाडतो. उंचपुरा पोलार्ड अफलातून फिल्डिंग करायचा. पोलार्ड फिल्डिंगद्वारे किमान 3-4 धावा सहच वाचवायचा. तर अशक्य कॅचही घ्यायचा. मात्र मुंबईला अजूनही पोलार्डच्या तोडीचा अष्टपैलू खेळाडू मिळालेला नाही. त्यामुळे गुजरात टायटन्समधून ट्रेडद्वारे मुंबईत येऊन कॅप्टन झालेल्या ऑलराउंडर हार्दिक पंड्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.
मुंबई टीममध्ये हार्दिक व्यतिरिक्त तसा तगडा ऑलराउंडर नाही. मुंबईत गेल्या वेळेस कॅमरुन ग्रीन होता. मात्र तो ट्रेड होऊन आरसीबीमध्ये गेला आहे. मोहम्मद नबी आणि रोमारियो शेफर्ड हे ऑलराउंडर आहेत, मात्र हे दोघे किती निर्णायक भूमिका बजावू शकतील, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. आता नबी आणि शेफर्ड हे दोघे आपल्या भूमिकेला किती न्याय देतात, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच.
मुंबई इंडियन्सने खरेदी केलेले खेळाडू | गेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, नुमान थुसारा, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज आणि नमन धीर.
मुंबई इंडियन्सने कायम ठेवलेले खेळाडू | रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टिम डेविड, विष्णु विनोद, अर्जुन तेंदुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल आणि जेसन बेहरेनडोर्फ.
ट्रेड केलेले खेळाडू | हार्दिक पांड्या (गुजरात टायटन्स) आणि रोमारियो शेफर्ड (लखनऊ सुपर जायंट्स)
रिलीज केलेले खेळाडू | अर्शद खान, रमनदीप सिंह, रितिक शौकीन, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, डुआन जेनसन, झाय रिचर्डसन, रिले मेरेडिथ, क्रिस जॉर्डन आणि संदीप वॉरियर.