IPL 2024 : आरसीबीच्या ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ समोर, पराभवानंतर असं होतं वातावरण Watch Video

| Updated on: May 23, 2024 | 4:14 PM

आयपीएलच्या 17व्या पर्वात आरसीबीचा प्रवास एलिमिनेटर फेरीत थांबला. राजस्थान रॉयल्सने 4 गडी राखून आरसीबीचा पराभव केला. यामुळे आरसीबीचं जेतेपदाचं स्वप्न भंगलं आहे. पराभवानंतर आरसीबीच्या ड्रेसिंग रुममधलं वातावरण एकदम निराशाजनक होतं.

IPL 2024 : आरसीबीच्या ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ समोर, पराभवानंतर असं होतं वातावरण Watch Video
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आयपीएल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. साखळी फेरीत सहा सामने करो या मरोची लढाई करत जिंकले आणि प्लेऑफमध्ये धडक मारली होती. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला खूपच अपेक्षा होत्या. पण आयपीएलच्या 17 व्या पर्वातही पदरी निराशा पडली. एलिमिनेटर फेरीत राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 4 गडी राखून पराभव केला. या सामन्यातील पराभव चाहत्यांप्रमाणेच खेळाडूंच्या जिव्हारी लागला. पराभवानंतर ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक आरसीबी चाहत्याला अश्रू अनावर झाले आहेत. आरसीबी फ्रेंचायसीने एक्स खात्यावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. सामन्यातील पराभवानंतर खेळाडूंचा मूड या व्हिडीओमध्ये दिसत आहे. राजस्थान विरुद्ध मिळालेल्या पराभवानंतर संपूर्ण संघाने निराश होत मैदान सोडले. पण जेव्हा ड्रेसिंग रुममध्ये पोहोचले तेव्हा आपोआपच वातावरण दु:खात बुडालं. साडेतीन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये सर्वकाही समोर आलं आहे.

राजस्थान विरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेल फेल गेला. जेव्हा त्याने ड्रेसिंग रुममध्ये एन्ट्री मारली तेव्हा त्याने जोरात दरवाज्यावर हात मारला. विराट कोहली मोबाईलमध्येच बघत राहिला होता. त्याने डोकं वर काढलं नाही. खेळाडू एकमेकांपासून दूर शांत बसलेले होते. कोणीच कोणाशीच बोलत नव्हतं. व्यवस्थापन स्टाफही निराश दिसला. फाफनेही दु:खात आपले दोन शब्द बोलून टाकले. इथपर्यंतचा सर्व प्रवास त्याने काही मिनिटांत व्यक्त केला. विराट कोहलीलाही इथपर्यंतचा प्रवास सांगताना भरून आलं होतं. दिनेश कार्तिकनेही आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

या सामन्याबद्दल सांगायचं तर, नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने लागला आणि सर्व काही तेथून बदलत गेलं. प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तसेच एकही खेळाडू हवी तशी कामगिरी करू शकला नाही. महत्त्वाच्या क्षणी खेळाडूंनी विकेट्स गमवल्या. तसेच दुसऱ्या डावातील दव गोलंदाजांना महागात पडलं. गचाळ क्षेत्ररक्षणामुळे राजस्थानवर दबाव टाकता आला नाही. त्यामुळे हा सामना हातातून वाळूसारखा प्रत्येक चेंडूवर निसटत होता. तरीही 19व्या षटकापर्यंत आरसीबीने झुंज दिली. अखेर 20 ते 25 धावा कमी पडल्याचं दिसून आलं.