आयपीएल जेतेपदावर शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने दहा वर्षानंतर मोहोर उमटवली. 2014 साली गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकात्याने बाजी मारली होती. आता दहा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कोलकाता नाईट रायडर्सने जेतेपद मिळवलं आहे. अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला आणि तिसऱ्यांदा जेतेपदाचा मान मिळवला. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादचा दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याचा मान हुकला. आयपीएल 2024 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना पाहिल्यानंतर क्रीडाप्रेमींना वुमन्स प्रीमियल लीगच्या अंतिम फेरीची आठवण आली आहे. कारण या दोन्ही सामन्यात काही गोष्टी समान घडल्या आहे. अंतिम फेरीत एक समांतर स्क्रिप्ट असल्याचं क्रीडाप्रेमींना दिसून आलं. हा निव्वल योगायोग असला तरी काही गोष्टी आश्चर्यकारक आहेत.
- आयपीएल 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स आमनेसामने आले होते. असंच काहीसं वुमन्स प्रीमियर लीगमध्ये घडलं होतं. दिल्ली कॅपिटल्सकडून ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार मेग लॅनिंग आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून भारतीय कर्णधार म्हणून स्मृती मंधाना होती.
- वुमन्स प्रीमियर लीग आणि आयपीएलमध्ये नाणेफेकीतही साम्य दिसून आलं आहे. वुमन्स प्रीमियर लीगमध्ये मेग लॅनिंगने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी घेतली. आयपीएलमध्ये पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला.
- पहिल्या डावातील धावांमध्ये समांतर असं घडलं. वुमन्स प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघ 18.3 षटकात 113 धावा करून ऑलआऊट झाले. आयपीएलमध्येही सनरायझर्स हैदराबादने 18.3 षटकं खेळली आणि 113 धावांवर डाव आटोपला.
- वुमन्स प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 8 विकेट्स राखून विजय मिळवला. तर आयपीएलमध्ये असंच घडलं. कोलकात्याने 2 विकेट गमवल्या आणि सनरायझर्सला पराभवाचं पाणी पाजलं.
- वुमन्स प्रीमियर लीगमध्ये भारतीय कर्णधार स्मृती मंधाना, तर आयपीएलमध्ये भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर यांनी ट्रॉफी उचलली.
यापूर्वी आरसीबी पुरुष आणि महिला संघांमध्ये असाच एक योग जुळून आला होता. 18 अंकाचं गणित यातून जुळून आलं होतं. त्यामुळे काही गोष्टी समांतर तरी घडल्या तरी त्या निव्वल योगायोग आहे हे लक्षात ठेवावं.