मुंबई | क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने 17 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यंदाचं वर्ष हे निवडणुकीचं आहे. त्यामुळे यंदा आयपीएल स्पर्धा ही टप्प्यात पार पडणार आहे. त्यानुसार बीसीसीआयने आयपीएलच्या 17 व्या मोसमासाठी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर केलं आहे. बीसीसीआयने 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान पहिला टप्पा पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 17 दिवसांमध्ये 21 सामने पार पडतील.
यंदाच्या 17 व्या मोसमातील सलामीचा सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. अर्थात हा सामना महेंद्रसिंह धोनी विरुद्ध विराट कोहली असा होईल. हा सामना 22 मार्च रोजी पार पडेल. पहिला सामना हा चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये पार पडणार आहे. तर या पहिल्या टप्प्यातील अखेरचा सामना हा 7 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पार पडेल.
मुंबई इंडियन्सचा पहिला सामना रविवारी 24 मार्च रोजी होणार आहे. मुंबई इंडियन्सच्या या मोसमातील सलामीच्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध सामना होणार आहे. हा सामना अहमदाबदमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. हार्दिक पंड्या आपल्या होम ग्राउंडमध्ये होम टीम विरुद्ध खेळणार आहे. हार्दिकची मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी झाली. तसेच तो मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे आता हार्दिक आपल्या नेतृत्वात मुंबईला विजयी सुरुवात देणार का, याकडे पलटणचं लक्ष असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2023 नुसार यंदाही 2024 च्या 17 व्या मोसमात एकूण 74 सामने पार पडतील. यंदा गत मोसमाच्या तुलनेत 7 दिवस जास्त थरार रंगणार आहे. 17 वा मोसम एकूण 67 दिवस पार पडेल. लोकसभा निवडणुकांमुळे हा निर्णय घेतला गेला आहे. याआधी 2019 च्या लोकसभा निवडणूकीवेळेसही अशाच पद्धतीने वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. तेव्हा 2 टप्प्यात आयपीएल स्पर्धा पार पडली होती.
आयपीएल 17 व्या मोसमासाठी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर
IPL 2024 SCHEDULE…!!!! #IPLonStar pic.twitter.com/QwWDkuhOko
— Johns. (@CricCrazyJohns) February 22, 2024
चेन्नई आणि मुंबई यशस्वी संघ
दरम्यान चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आयपीएल इतिहासातील यशस्वी संघ आहेत. सीएसके आणि एमआय या दोन्ही संघांनी संयुक्तरित्या 5-5 वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मुंबई इंडियन्स सर्वात यशस्वी टीम होती. मात्र चेन्नईने 2023 आयपीएल फायनलमध्ये गुजरात टायटन्सचा धुव्वा उडवत विजेतेपट पटकावलं आणि मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक वेळा आयपीएल जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.
मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशा एकूण 5 हंगामात रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली आहे. तर चेन्नईने 2010,2011, 2018, 2021 आणि 2023 साली आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.
आयपीएल अध्य अरुण धुमल यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलेलं की 22 मार्चपासून आयपीएल 17 व्या हंगामाला सुरुवात होईल. तसेच वेळापत्रक हे टप्प्यात प्रसिद्ध केलं जाणार असल्याचंही धुमल यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच उर्वरित वेळापत्रक हे लोकसभा निवडणुकांच्या वेळापत्रकानुसार जाहीर केलं जाणार असल्याचंही धूमल यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता चाहत्यांना उर्वरित वेळापत्रकासाठी लोकसभा निवडणुकांची वाट पाहावी लागणार आहे.