आयपीएल 2024 स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजय आणि नेट रनरेट प्लेऑफचं गणित ठरवणार आहे. त्यामुळे नेट रनरेटबाबत प्रचंड उत्सुकता आहे. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्स विरुद्धचा सामना जिंकला तर दोघांचे 14 गुण होतील. त्यामुळे प्लेऑफचं गणित हे नेट रनरेटवर ठरवलं जाईल. चेन्नई सुपर किंग्स 14 गुण आणि 0.+528 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 12 गुण आणि +0.387 नेट रनरेटसह सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला फक्त विजय मिळवून चालणार नाही. चेन्नई सुपर किंग्सला 18 धावा किंवा 11 चेंडू राखून जिंकावं लागेल. पण हे सर्व नेमकं ठरतं तरी कसं? नेट रनरेट कसा काढला जातो असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. तर चला तर अगदी सोप्या भाषेत हे गणित समजून घेऊयात
नेट रनरेट काढण्यासाठी संघाने किती षटकात किती धावा केल्या आणि विरोधी संघाने किती षटकात त्या धावा केल्या हे पाहिलं जातं. म्हणजेच (एकूण धावा/एकूण षटकं-विरोधी संगाच्या धावा/एकूण षटकं) असं गणित आहे. आकडेवारीतून हे गणित समजून घेऊयात. एका संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 140 धाव केल्या (140/20) आणि प्रतिस्पर्धी संघाने 20 षटकात 130 धावा केल्या. तर फलंदाजी करणाऱ्या संघाचा नेट रनरेट हा (7-6.5)= +0.5 इतका असेल. पराभूत झालेल्या संघाचा नेट रनरेट हा -0.5 इतका असेल. दुसरं उदाहरण द्यायचं तर, दुसऱ्या संघाने 20 षटकात 139 धावा केल्या आणि सामना एका धावेने गमवाला. तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा नेट रनरेट हा +0.05 इतका असेल. तर प्रतिस्पर्धी संघाचा नेट रनरेट हा -0.05 इतका असेल.
प्रत्येक सामन्यानंतर नेट रनरेट हा खाली वर होत असतो. सध्याच्या नेट रनरेटमध्ये त्या सामन्याचा नेट रनरेट अधिक वजा केला जातो आणि ठरवलं जातं. सध्याचं गणित पाहता चेन्नई सुपर किंग्सचा नेट रनरेट 0.+528 हा आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा नेट रनरेट हा +0.387 इतका आहे. त्यामुळे आरसीबीला सामना जिंकून चेन्नईच्या पुढे जायचं तर हा सामना 18 धावांनी किंवा 11 चेंडू राखून जिंकावा लागेल. तर प्लेऑफचं तिकीट मिळेल.
चेन्नई सुपर किंग्सने आरसीबीला पहिल्या सामन्यात 6 विकेट्स आणि 8 चेंडू राखून पराभूत केलं होतं. आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 173 धावा केल्या होत्या. तर हे आव्हान चेन्नई सुपर किंग्सने 18.4 षटकात पूर्ण केलं होतं. पहिल्या सामन्यातील नेट रनरेट काढायचा तर (आरसीबीच्या 173/20=8.65) (चेन्नई सुपर किंग्सच्या 176/18.4=9.56 )
चेन्नई सुपर किंग्सचा +0.91 इतका नेट रनरेट होता. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा नेट रनरेट हा -0.91 इतका होता.