आयपीएल 2024 स्पर्धेच्या 46 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादला दणका दिला. हैदराबादचे फलंदाज भलतेच फॉर्मात असताना पराभूत करणं खरंच खूप कठीण होतं. मात्र चेन्नई सुपर किंग्सने हा सामना एकतर्फी जिंकला. इतकंच काय तर 78 धावांनी सामना जिंकल्याने गुणतालिकेत सनरायझर्स हैदराबादला दणका दिला आहे. सहाव्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर सनरायझर्स हैदराबादची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात प्लेऑफची रंगत आणखी वाढणार आहे. कारण लखनौ, हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स यांचे समान दहा गुण असून नेट रनरेटचा काय तो फरक आहे. चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेकीचा कौल गमवल्याने फलंदाजी वाटेला आली. त्यामुळे या सामन्यात हैदराबाद बाजी मारेल असंच वाटत होतं. मात्र घडलं भलतंच..ऋतुराज गायकवाडने केलेल्या 98 धावा आणि तुषार देशपांडेने घेतलेल्या 4 विकेट्स यामुळे हैदराबादचा संघ बॅकफूटवर गेला. हैदराबादला 20 षटकंही पूर्ण खेळता आली नाही. 19 व्या षटकात सर्वबाद 134 धावा करता आल्या आणि 78 धावांनी दारूण पराभव झाला. या सामन्यानंतर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने आपलं मत व्यक्त केलं आहे.
“आम्हाला वाटले की जिंकण्याची ही आमची सर्वोत्तम संधी आहे. त्यांनी 210 पर्यंत मजल मारण्यासाठी चांगली फलंदाजी केली. पण आमच्या फलंदाजी लाइनअपमध्ये आम्हाला संधी मिळाली होती, खेळपट्टीही चांगली खेळत होती. फलंदाजीची क्रमवारी कशी चालली आहे याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत. त्या लाइनअपमधील प्रत्येकाने स्पर्धेत कधीतरी खेळ केला आणि जिंकून दिला आहे. आता नक्कीच दव पडलं आहे पण पहिल्या डावातही तेच होते. पराभवातून शिकून आम्ही पुन्हा येऊ.”, असं हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने सांगितलं.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.