IPL 2024, CSK vs SRH : चेन्नई सुपर किंग्सने हैदराबादला केलं पराभूत, 78 धावांनी पाजलं पराभवाचं पाणी

| Updated on: Apr 28, 2024 | 11:35 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 46वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 3 गडी गमवून 212 धावा केल्या आणि विजयासाठी 213 धावांचं आव्हान दिलं. हैदराबादचा संघ मात्र 134 धावा करू शकला.

IPL 2024, CSK vs SRH : चेन्नई सुपर किंग्सने हैदराबादला केलं पराभूत, 78 धावांनी पाजलं पराभवाचं पाणी
Image Credit source: Twitter
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेतील 46व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादला पराभूत केलं. नाणेफेकीचा कौल गमवल्याने चेन्नई सुपर किंग्सच्या वाटेला फलंदाजी आली होती. दुसऱ्या डावात पडणाऱ्या दवबिंदूंचा अंदाज घेऊन 200 पार धावसंख्या असायला हवी यासाठी प्रयत्न होता. चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात निराशाजनक झाली. अजिंक्य रहाणे फक्त 9 धावा करून बाद झाला. मात्र त्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि डेरिल मिचेल यांनी मोर्चा सांभाळला. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 107 धावांची भागीदारी केली. ऋतुराज गायकवाडने 54 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 98 धावा केल्या. तर डेरिल मिचेलने 32 चेंडूत 39 धावा केल्या. त्यानंतर शिवम दुबेने 20 चेंडूत नाबाद 39 धावा आणि धोनीने 2 चेंडूत नाबाद 5 धावा करत धावसंख्या 212 पर्यंत पोहोचवली. तसेच विजयासाठी 213 धावांचं आव्हान ठेवलं. ही धावसंख्या दुसऱ्या डावात आरामात गाठली जाईल असं वाटत होतं. मात्र तसं काही झालं नाही. हैदराबादला सुरुवातीला दणके बसले. तुषार देशपांडेने हैदराबादला बॅकफूटवर ढकललं. हैदराबादने 20 षटकात सर्वबाद 134 धावा केल्या. चेन्नईने हैदराबादला 78 धावांनी पराभूत केलं.

तुषार देशपांडेने फॉर्मात असलेल्या ट्रेव्हिस हेडला तंबूचा रस्ता दाखवला. 13 धावांवर असताना डेरिल मिचेल त्याचा झेल घेतला. त्यानंतर आलेल्या अनमोलप्रीत सिंगला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतरच्या षटकात पुन्हा एकदा तुषार देशपांडेने दणका दिला. अभिषेक शर्माला 15 धावांवर असताना तंबूचा रस्ता दाखवला. रवींद्र जडेजानेही जबरदस्त गोलंदाजी केली. 4 षटकात 22 धावा देत 1 गडी बाद केला. तर मथीशा पथिरानाने एडन मार्करमचा त्रिफळा उडवला. दुसऱ्या षटकात हेन्रिक क्लासेनला बाद करत सामना आपल्या पारड्यात झुकवला. शार्दुल ठाकुरलाही एक गडी बाद करण्यात यश आलं. मुस्तफिझुर रहमानने दोन गडी बाद करत हैदराबादला पराभवाचं दरीत ढकललं. या विजयासह चेन्नई सुपर किंग्सने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.