आयपीएल 2024 स्पर्धेतील प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. हा सामना दोन्ही संघांचं प्लेऑफचं गणित ठरवणारा आहे. त्यामुळे दोन्ही संघांची विजयासाठी धडपड सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल लखनौने जिंकला आणि कर्णधार केएल राहुलने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं तर हा निर्णय दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत याच्या मनासारखा झाला. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 4 गडी गमवून 208 धावा केल्या आणि विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान आता लखनौ सुपर जायंट्स पूर्ण करणार का याकडे लक्ष लागून आहे. जर हा सामना लखनौने गमावला तर प्लेऑफचं गणित खूपच किचकट होईल. कारण लखनौ सुपर जायंट्सचा नेट रनरेट खूपच कमी आहे. त्यामुळे आरसीबी, चेन्नई, हैदराबाद आणि दिल्लीला नकळत फायदा होईल.
दिल्लीकडून जेक फ्रेझर मॅकगुर्क आणि अभिषेक पोरेल ही जोडी मैदानात उतरली होती. पण पहिल्या षटकातच दिल्लीला धक्का बसला. जेक फ्रेझरला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे दिल्ली संघावर दडपण आलं होतं. पण अभिषेक पोरेल आणि शाई होप यांनी डाव सावरला. दुसऱ्या गड्यासाठी 92 धावांची भागीदारी केली. अभिषेक पोरेलने 33 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकाराच्या मदतीने 58 धावा केल्या. शाई होप 23 चेंडूत 33 धावा करून तंबूत परतला. ऋषभ पंतकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र 23 चेंडूत 33 धावा केल्या आणि बाद झाला. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि अक्षर पटेल यांनी शेवटच्या षटकात जोरदार फटकेबाजी केली. खासकरून स्टब्सने गोलंदाजांना सोलून काढलं. स्टब्सने 22 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, युधवीर सिंग चरक, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक पोरेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, गुलबदिन नायब, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद.