आयपीएल 2024 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सला 19 धावांनी पराभूत केलं. या विजयासह गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. पण दिल्ली कॅपिटल्सचे साखळी फेरीचे सर्व सामने संपले आहेत. त्यामुळे आता प्लेऑफचं गणित नेट रनरेटवर अवलंबून असणार आहे. रेसमध्ये असलेल्या संघांचे 14 आणि नेट रनरेट कमी असेल तर दिल्ली कॅपिटल्सला संधी मिळू शकते. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण दिल्ली कॅपिटल्सला कमी धावांवर रोखण्यात अपयश आलं. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 4 गडी गमवून 208 धावा केल्या आणि 209 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना दिल्ली कॅपिटल्सने पॉवर प्लेमध्येच विकेट गमवल्या. त्यामुळे दडपण वाढलं. निकोलस पूरनने मधल्या फळीत जोरदार फटकेबाजी केली. तर अर्शद खानने तळाला येत सामना जिवंत ठेवला. पण त्याची झुंज अपयशी ठरली. लखनौ सुपर जायंट्स 20 षटकात 9 गडी गमवून 189 धावा करू शकला. या पराभवामुळे आता लखनौ सुपर जायंट्सचं प्लेऑफचा मार्ग कठीण झाला आहे. नेट रनरेट खूपच खराब आहे.
दिल्ली कॅपिटल्सकडून अभिषेक पोरेल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी चांगली फलंदाजी केली. अभिषेकने 33 चेंडूत 58 धावा केल्या. तर ट्रिस्टन स्टब्सने डेथ ओव्हरमध्ये चांगलीच धुलाई केली. त्याने 25 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने नाबाद 57 धावा केल्या. जेक फ्रेझर मॅकगुर्कला आपलं खातंही खोलता आलं नाही. तर शाई होपने 27 चेंडूत 38, पंतने 23 चेंडूत 33 धावा केल्या. तर अक्षर पटेल 10 चेंडूत 14 धावा करत नाबाद राहिला.
दिल्ली कॅपिटल्सने आठ गोलंदाज मैदानात उतरवले होते. यात इशांत शर्माने चार षटकांचा स्पेल पूर्ण केला. त्याने 4 षटकात 34 धावा देत 3 गडी बाद केले. त्यानंतर खलील अहमद, अक्षर पटेल, मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. तर रवि बिष्णोई हा जेक फ्रेझर मॅकगुर्कच्या थ्रोवर धावचीत होत तंबूत परतला.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, युधवीर सिंग चरक, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक पोरेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, गुलबदिन नायब, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद.