लखनौ सुपर जायंट्सच्या पराभवानंतर संजीव गोयंका पुन्हा उतरले मैदानात, आता केलं असं काही

| Updated on: May 15, 2024 | 12:38 AM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 64वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. या सामन्यातही लखनौ सुपर जायंट्सला विजय मिळवता आला नाही. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर संजीव गोयंका यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या सामन्यानंतर ते पुन्हा मैदानात उतरले पण चित्र वेगळं होतं.

लखनौ सुपर जायंट्सच्या पराभवानंतर संजीव गोयंका पुन्हा उतरले मैदानात, आता केलं असं काही
Image Credit source: IPL/BCCI
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सने शेवटच्या टप्प्यात सूर गमावला आणि प्लेऑफच्या शर्यत कठीण झाली आहे. आता लखनौ सुपर जायंट्सचं गणित आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्स या सामन्यात अवलंबून असणार आहे. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्ससमोर विजयासाठी 209 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण लखनौ सुपर जायंट्स संघ 9 गडी गमवून 189 धावा करू शकला. दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सला 19 धावांनी पराभूत केलं. या पराभवामुळे लखनौ सुपर जायंट्सच्या नेट रनरेटवरही परिणाम झाला आहे. प्लेऑफच्या आशा कायम असल्या तरी नेट रनरेट पाहता खूपच कठीण आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्याचा सर्वाधिक फटका हा लखनौ सुपर जायंट्सला बसला आहे. कारण त्या सामन्यात हैदराबादने एकही विकेट न गमवता 166 धावांचं आव्हान 9.4 षटकात पूर्ण केलं. त्यामुळे नेट रनरेट खूपच ढासळला. या सामन्यानंतर संजीव गोयंकाही वेगळ्याच मूडमध्ये दिसले होते. आता पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं. मात्र यावेळी संजीव गोयंका यांनी तसं काही केलं नाही.

दिल्ली कॅपिटल्सकडून 20 धावांनी पराभव झाल्यानंतर संजीव गोयंका मैदानात उतरले. त्यांनी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत याला मिठी मारली. त्यानंतर कर्णधार केएल राहुलकडे गेले आणि त्याच्याशी संवाद साधला. तसेच शांतपणे केएल राहुल याच्याशी चर्चा करताना दिसले. तसेच त्याला मिठी मारली. त्यांच्या चर्चेचा व्हिडीओ आणि फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या सामन्यादरम्यान केएल राहुलने एक जबरदस्त झेल पकडला. जवळपास हा झेल हातातून सुटलेला होता.मात्र पुन्हा एकदा उडी घेत झेल घेतला. हा झेल पकडल्यानंतर संजीव गोयंका यांनी टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन केलं. शाई होप 38 धावांवर असताना रवि बिष्णोईच्या गोलंदाजीवर हा झेल घेतला. तेव्हा अभिषेक पोरेल आणि शाई होप यांची जोडी जमली होती. या दोघांनी 92 धावांची भागीदारी केली होती.

लखनौ सुपर जायंट्सचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध आहे. हा सामना 17 मे रोजी आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना आहे. हा सामना काहीही करून मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. जर या सामन्यात पराभव झाला तर आरसीबी-सीएसके सामन्यापूर्वीच आव्हान संपुष्टात येईल.