IPL 2024 Final, KKR vs SRH : अंतिम सामन्यापूर्वी खेळपट्टीत मोठा बदल! कोणाला होणार मदत? जाणून घ्या

| Updated on: May 26, 2024 | 3:00 PM

आयपीएल 2024 जेतेपदासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन संघ आमनेसामने येणार आहे. जेतेपदावर कोण नाव कोरणार याची उत्सुकता लागून आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर हा सामना होत आहे. या मैदानात मागच्या सामन्यात हैदराबादने राजस्थानला फिरकीवर नाचवलं होतं. पण अंतिम सामन्यासाठी वेगळी खेळपट्टी असणार आहे.

IPL 2024 Final, KKR vs SRH : अंतिम सामन्यापूर्वी खेळपट्टीत मोठा बदल! कोणाला होणार मदत? जाणून घ्या
Image Credit source: IPL/BCCI
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेच्या जेतेपदाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोलकाता नाईट रायडर्स की सनरायझर्स हैदराबाद यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. आतापर्यंत हे दोन्ही संघ 27 वेळा आमनेसामने आले आहेत. यात कोलकात्याने 18, तर हैदराबादने 9 वेळा विजय मिळवला आहे. क्वॉलिफायर 1 फेरीतही कोलकात्याने हैदराबादला पराभवाचं पाणी पाजलं होतं. त्यामुळे कोलकात्याचं पारडं जड असल्याचं मानलं जात आहे. पण चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानात होणाऱ्या सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, या मैदानातील खेळपट्टीची चर्चा रंगली आहे. अंतिम सामन्यात फलंदाजीसाठी उपयुक्त ठरेल अशी खेळपट्टी तयार केल्याचं, आयपीएल समालोचक केविन पीटरसन याने सांगितलं आहे.त्यामुळे या सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही खेळपट्टी वानखेडे मैदानाप्रमाणे लाल मातीची असणार आहे असं क्युरेटरने सांगितल्याचं केविन पीटरसन याने सांगितलं.

चेपॉकवर झालेल्या क्वॉलिफायर 2 फेरीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी सनरायझर्स हैदराबादला 175 धावांवर रोखलं होतं. तर हैदराबादने राजस्थानला 139 धावांवर रोखत 36 धावांनी विजय मिळवला होता. तसेच अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. मात्र ती खेळपट्टी अंतिम फेरीत नसणार आहे. लाल मातीच्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडेल. दोन्ही संघात आक्रमक फलंदाजी करणार फलंदाज आहेत. त्यामुळे चौकार आणि षटकारांची आतषबाजी होईल यात शंका नाही. म्हणजेच या मैदानावर 200 हून अधिक धावा होण्याची शक्यता आहे.

नाणेफेकीचा कौल महत्त्वाची भूमिका बजावेल. मागच्या सामन्यात दुसऱ्या डावात दव पडलं नाही. त्यानुळे राजस्थानला फटका बसला होता. आता मात्र पावसाची शक्यता असल्याने चित्र वेगळं असेल. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघांना 180 धावांच्या आसपास रोखलं तर मात्र विजय जवळपास निश्चित होईल. आता नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने लागतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

कोलकाता नाइट रायडर्स संघ : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, मनीष पांडे , नितीश राणा, श्रीकर भारत, शेरफान रदरफोर्ड, दुष्मंथा चमेरा, चेतन साकारिया, अंगकृष्ण रघुवंशी, साकिब हुसेन, सुयश शर्मा, अल्लाह गझनफर.

सनरायझर्स हैदराबाद संघ : ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, जयदेव उनाडकट, शाहबाज अहमद, उमरान मलिक, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे, मयंक अग्रवाल, वॉशिंग्टन सुंदर, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र यादव, जाटवेद सुब्रह्मण्यन, विजयकांत वसकांत, फजलहक फारुकी, मार्को जानसेन, आकाश महाराज सिंग.