मुंबई | भारतीय क्रिकेट वर्तुळातून अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटर नवज्योत सिंग यांची पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री निश्चित झाली आहे. नवज्योत सिंह यांचं समालोचक म्हणून पुनरागमन होणार आहे. सिद्धू आपल्या हटके स्टाईलने आयपीएलमध्ये पुन्हा एकदा कॉमेंट्री करताना दिसणार आहेत. सिद्धू यांनी आतापर्यंत अनेकदा शेरोशायरी आणि खास शैलीत कॉमेंट्री केली आहे. क्रिकेट चाहत्यांना त्यांचा हाच अंदाज आवडतो. काही चाहते हे त्यांची कॉमेंट्री ऐकण्यासाठी सामने पाहतात. सिद्धू यांनी अनेक ब्रॉडकास्टर्ससाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर समालोचन केलं आहे.
आयपीएलच्या 17 व्या मोसमाला आता काही दिवस शिल्लक आहे. आयपीएल 2024 ला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. यंदाच्या हंगामातील सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु असा सामना होणार आहे. या सामन्यात महेंद्रसिंह धोनी विरुद्ध विराट कोहली असा सामना असणार आहे. या सामन्यासाठी एका बाजूला क्रिकेट चाहत्यांमध्ये तिकीटासाठी चढाओढ पाहायला मिळतेय. तर दुसऱ्या बाजूला आता सिद्धू यांची कॉमेंट्री ऐकण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सलामीच्या सामन्याआधी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कने सोशल मीडियावरुन सिद्धू कॉमेंट्री करणार असल्याची माहिती दिली.
नवज्योत सिंह यांची क्रिकेट कारकीर्द ही 15 वर्षांची राहिली. सिद्धू यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये 51 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं. सिद्धू यांनी 51 सामन्यांमध्ये 1 द्विशतक आणि 9 शतकांसह 3 हजार 202 धावा केल्या. तसेच 136 वनडे मॅचेसमध्ये 4 हजार 413 धावा केल्या.
ठोको ताली
A wise man once said, “Hope is the biggest ‘tope’”
And this wise man, the great @sherryontopp himself, has joined our Incredible StarCast! 👏
Don’t miss his incredible commentary (and gajab one-liners) in #IPLOnStar – STARTS MAR 22, 6:30 PM onwards, LIVE on Star Sports Network! pic.twitter.com/BjmFq9OKQ4
— Star Sports (@StarSportsIndia) March 19, 2024
सिद्धू यांनी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर 2001 साली समालोचक म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर 2004 साली त्यांनी राजकीय खेळीला सुरुवात केली. सिद्ध 2004 साली भाजपसह जोडले गेले. सिद्धूनी संसदेतील लोकसभा आणि राज्यसभा आणि कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा दोन्ही सभागृहाचं प्रतिनिधित्व केलं. सिद्धू पंजाब सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत. सिद्धू यांनी क्रीडा आणि राजकारणाशिवाय मनोरंजन क्षेत्रातही वकृत्त्वाच्या जोरावर धमाकेदार कामगिरी केली. सिद्धू यांनी छोट्या पडदा गाजवला. सिद्धू बिग बॉस, द कपिल शर्मा शो, लाफ्टर चॅलेंज, एक्स्ट्रा इनिंग विथ टी 20 यासारखे कार्यक्रम गाजवले. त्यानंतर आता सिद्धू पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत.