मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स दोन्ही संघ आयपीएलच्या 17 व्या मोसमातील आपला सलामीचा सामना खेळण्यासाठी सज्ज आहेत. या मोसमातील दुसऱ्या डबल हेडरचं 24 मार्च रोजी आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात उभयसंघ भिडणार आहेत. दोन्ही संघांचे कर्णधार हे नवीन आहेत. हार्दिक पंड्या याची गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी झालीय. हार्दिक पंड्या मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याला नेतृत्वाची जबाबदारी मिळालीय. त्यामुळे दोघांची कर्णधार म्हणून अग्निपरीक्षा असणार आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल. सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. याच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएलच्या 16 व्या मोसमातील अंतिम सामना आणि वर्ल्ड कपचा अंतिम सामना पार पडला होता. आता या सामन्यानिमित्ताने गुजरात आणि मुंबई या दोघांमध्ये वरचढ कोण आहे? हे जाणून घेऊयात.
आयपीएलच्या इतिहासात मुंबई विरुद्ध गुजरात दोन्ही संघ एकूण 4 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये दोन्हा संघांमध्ये बरोबरीची लढाई राहिली आहे. मुंबई आणि गुजरात दोघांनी प्रत्येकी 2-2 सामने जिंकले आहेत.
तसेच गुजरातने या स्टेडियममध्ये खेळलेल्या 10 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 4 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. तसेच मुंबईची या मैदानातील आकडेवारी चिंताजनक आहे. मुंबईला या स्टेडियममध्ये खेळलेल्या 4 पैकी फक्त एका सामन्यातच विजय मिळवता आला आहे. तर 3 वेळा प्रतिस्पर्धी संघांकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलंय. त्यामुळे आता मुंबई सलामीच्या सामन्यात विजय मिळवून ही आकडेवारी सुधारणार का? याकडे पलटणचं लक्ष असणार आहे.
गुजरात टायटन्स टीम : शुबमन गिल (कॅप्टन), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, उमेश यादव, नूर अहमद, केन विल्यमसन, मॅथ्यू वेड, जयंत यादव, संदीप वॉरियर, शाहरुख खान, अभिनव मनोहर, शरथ बीआर, आर साई किशोर, दर्शन नळकांडे, कार्तिक त्यागी, स्पेन्सर जॉन्सन, अजमतुल्ला उमरझाई आणि सुशांत मिश्रा.
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पांड्या (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, ल्यूक वुड, सूर्यकुमार यादव, श्रेयस गोपाल, विष्णू विनोद, शम्स मुलानी, रोमारियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, आकाश मधवाल, नुवान तुषारा, देवाल्ड ब्रेविस, क्वेना मफाका आणि नमन धीर.