आयपीएल स्पर्धेतील 24वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून ठेवणारा सामना होता. अखेर राशीद खानने चौकार मारत गुजरात टायटन्सला विजय मिळवून दिला. यामुळे राजस्थानचं सलग पाच सामने जिंकण्याचं स्वप्न भंगलं. या स्पर्धेतील पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं. पण आता राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याला आणखी एक धक्का बसला आहे. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आलं आहे. स्लो ओव्हर रेटसाठी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आयपीएल आपल्या अहवालात सांगितलं आहे की, “राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनवर 12 लाखांचा दंड लागला. कारण टीमने गुजरात टायटन्सविरुद्ध स्लो ओव्हर रेट ठेवला होता. आयपीएल आचारसंहितेनुसार हा संघाचा पहिला गुन्हा होता. त्यामुळे 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.” दुसऱ्यांदा असा प्रकार घडला तर संजू सॅमसनसोबत संपूर्ण संघाला दंड भरावा लागणार आहे.
राजस्थान रॉयल्सने धीम्या गतीने गोलंदाजी केल्याने शेवटच्या षटकात 4 ऐवजी पाच क्षेत्ररक्षण 30 यार्डच्या आत ठेवावे लागले. त्यामुळे काही अंशी गुजरातला फायदा झाला. चौकार मारताना सीमारेषेवर एक क्षेत्ररक्षक कमी असल्याचा फायदा झाला असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. या पर्वात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत दोन वेळा स्लो ओव्हर रेटसाठी दोषी ठरला आहे. तर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिललाही एकदा दंड भरावा लागला आहे. जर कोणता संघ तिसऱ्या स्लो ओव्हर रेटचा गुन्हा करतो. तेव्हा 30 लाखांच्या दंडासह एका सामन्याची बंदी घातली जाते.
राजस्थान रॉयल्सचा पुढचा सामना 13 एप्रिलला पंजाब किंग्सशी होईल. त्यानंतर 16 एप्रिलला कोलकात नाईट रायडर्सशी, 22 एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. जयपूरच्या सवाई मनासिंग इंदूर स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. वानखेडेवर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. त्यामुळे आता या सामन्यात मुंबई इंडियन्स पराभवाचा वचपा काढणार का? याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागून आहे.
दरम्यान, राजस्थान रॉयल्सचं पराभवानंतरही गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम आहे. 8 गुणांसह राजस्थानचा संघ पहिल्या स्थानावर आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या, लखनौ सुपर जायंट्स तिसऱ्या, चेन्नई सुपर किंग्स चौथ्या, सनरायझर्स हैदराबाद पाचव्या, गुजरात टायटन्स सहाव्या, पंजाब किंग्स सातव्या, मुंबई इंडियन्स आठव्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु नवव्या आणि दिल्ली कॅपिटल्स दहाव्या स्थानावर आहे.