IPL 2024 GT vs RR : राजस्थान रॉयल्सच्या पराभवाचं कारण काय? संजू सॅमसन एका वाक्यात उत्तर देत म्हणाला की…

| Updated on: Apr 11, 2024 | 2:35 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 24वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. हा सामना गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर जिंकला. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचं सलग पाच सामने जिंकण्याचं स्वप्न भंगलं. या सामन्यानंतर पराभवाचं खापर कर्णधार संजू सॅमसन याने थेट एका चेंडूवर फोडलं.

IPL 2024 GT vs RR : राजस्थान रॉयल्सच्या पराभवाचं कारण काय? संजू सॅमसन एका वाक्यात उत्तर देत म्हणाला की...
IPL 2024 GT vs RR : संजू सॅमसनने पराभवाचं विश्लेषण एका वाक्यात केलं, सांगितलं नेमकं चुकलं कुठे?
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सची विजयी घोडदौड सुरु होती. पहिल्या चार सामन्यात विजय मिळवल्यानंतर विजयाचा पंच मारणार असंच क्रीडाप्रेमींना वाटत होतं. पण तसं झालं नाही. गुजरात टायटन्सने राजस्थानचा विजयी रथ रोखला. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचं सलग पाच सामने जिंकण्याचं स्वप्न भंगलं. राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 3 गडी गमवून 196 धावा केल्या. तसेच विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं. शेवटच्या चेंडूवर चौकार मारत गुजरातने विजय मिळवला. गुजरात टायटन्सला 6 चेंडूत 15 धावांची आवश्यकता होती. कर्णधार संजू सॅमसनने शेवटचं षटक आवेश खानच्या हाती सोपवलं होतं.

राशीद खानने पहिल्या चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा घेतल्या. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा चौकार मारला. त्यामुळे 3 चेंडू आणि 5 धावा अशी स्थिती आली. चौथ्या चेंडूवर राशीद खानने एक धावा घेतली. पाचव्या चेंडूवर राहुल तेवतियाने फटका मारला आणि दोन धावा पूर्ण केल्या. मात्र तिसरी धाव घेताना धावचीत झाला. त्यामुळे एक चेंडू आणि 2 धावा अशी स्थिती आली. शेवटच्या चेंडूला समोर राशीद खान होता आणि त्याने चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यातील पराभवानंतर संजू सॅमसनने मन मोकळं केलं. नेमका पराभव कुठे झाला ते सांगितलं.

नेमकं कुठे चुकलं? समालोचकाने हा प्रश्न विचारताच संजू सॅमसन म्हणाला, “शेवटच्या चेंडूवर”. समालोचकाने पुन्हा विचारलं खरंच? तेव्हा संजू सॅमसनने सांगितलं की, “यावेळेस सांगणं कठीण आहे. सामन्यानंतर कर्णधाराला सांगणं कठीण होतं, नेमकी मॅच कुठे गमावली. जेव्हा आम्ही शांत होऊ तेव्हा सांगू शकेल. गुजरात टायटन्सला श्रेय देईल. या स्पर्धेतील हेच सौंदर्य आहे. आम्हाला शिकून पुढे जायला हवं. मी जेव्हा फलंदाजी करत होतो तेव्हा मला वाटलं की 180 च्या आसपासस धावा होतील. मला वाटते 197 हा विजयी स्कोअर होता. दवही पडलं नव्हतं आणि विकेट सुकलेली होती. त्याचबरोबर चेंडू खाली राहात होता. आमच्या गोलंदाजांनी आक्रमकपणे तसं करायला हवं होतं. पण त्यांनी चांगली फलंदाजी केली.”

गुजरात टायटन्सने राजस्थानला पराभूत केलं असलं तरी गुणतालिकेत तसा काही फरक पडला नाही. राजस्थानचा संघ 8 गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर गुजरातच्या गुणसंख्येत दोन गुणांची भर पडली. मात्र रनरेटच्या अभावी सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागत आहे. कोलकाता, लखनौ, चेन्नई आणि हैदराबादचे प्रत्येकी 6 गुण आहेत.