आयपीएल 2024 स्पर्धेतून गुजरात टायटन्सचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं आहे. पावसामुळे गुजरातचं प्लेऑफचं गणित फिस्कटलं. गुजरातचे साखळी फेरीत दोन सामने शिल्लक होते. त्यामुळे 14 गुण कमवण्याची संधी होती. कोलकाता आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध सामना होता. मात्र कोलकात्याविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे प्लेऑफचं स्वप्न भंगलं आहे. हा सामना रद्द केल्याने कोलकाता आणि गुजरातला प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे. त्यामुळे पुढचा सामना गुजरातने जिंकला तरी 13 गुण होतील. तर टॉप चारमध्ये असलेल्या संघांचे 14 पेक्षा जास्त गुण आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स, पंजाबनंतर स्पर्धेतून बाद होणारा गुजरात टायटन्स हा तिसरा संघ आहे. कोलकात्याने आधीच प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं आहे. एक गुण मिळाल्याने टॉप 2 मधलं स्थान आता आणखी घट्ट झालं आहे. कोलकात्याला प्लेऑफमध्ये दोन संधी मिळतील. तर उर्वरित तीन संघांसाठी सहा संघांमध्ये चुरस आहे.
राजस्थान रॉयल्स संघाचंही प्लेऑफचं तसं पक्कं आहे. पण एक सामना जिंकला की पात्र ठरणारा दुसरा संघ ठरेल. तर सनरायझर्स हैदराबादचे दोन सामने शिल्लक आहेत. सध्या हैदराबादचा संघ चौथ्या स्थानी असून 14 गुण आहेत. त्यामुळे हैदराबादला 18 गुण करण्याची संधी आहे. तर चेन्नई सुपर किंग्स 14 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. चेन्नईचा फक्त एकच सामना शिल्लक असून आरसीबीसोबत आहे. या सामन्यात बंगळुरुने बाजी मारली तर मग चेन्नईचं कठीण होईल. हा सामना बंगळुरुने 18 किंवा त्याहून अधिक धावांनी जिंकावा. तसेच दिलेलं आव्हान 18.1 षटकात पूर्ण केलं तर बंगळुरु प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो.
दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचा एक सामना शिल्क आहे. दिल्लीला सुद्धा 14 करण्याची संधी आहे. पण दिल्ली कॅपिटल्सचा नेट रनरेट खूपच कमी आहे. त्यामुळे एका सामन्यात कव्हर करणं खूपच कठीण आहे. लखनौ सुपर जायंट्सचे दोन सामने शिल्लक आहेत. दोन्ही सामने जिंकल्यास लखनौला प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळेल. पण दोनपैकी एक सामना गमवल्यास कठीण होईल. कारण लखनौचा नेट रनरेट खूपच कमी आहे.