मुंबई : आयपीएल स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना होणार आहे. त्यानंतर स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. कारण या दोन संघात बरीच उलथापालथ झाली आहे. हार्दिक पांड्याच्या हाती आता गुजरात नाही तर मुंबईची कमान असणार आहे. तर गुजरातची धुरा शुबमन गिलच्या हाती आहे. पण गुजरात संघावर सर्वाधिक दडपण आहे. कारण महत्त्वाचे खेळाडू संघात नाहीत. आघाडीचा गोलंदाज मोहम्मद शमी या स्पर्धेत खेळणार नाही. त्यामुळे गोलंदाजीला एका अर्थाने लकवा मारल्यासारखं झालं आहे. मोहम्मद शमीची जागा भरणं वाटतं तितकं सोपं नाही. मोक्याच्या क्षणी गडी बाद करण्याची क्षमता मोहम्मद शमीमध्ये आहे. तसा गोलंदाज सापडणं कठीण आहे. असं सर्व असताना मोहम्मद शमीसारखा नाही पण त्याची जागा भरून काढणारा गोलंदाज सापडला आहे. टीम मॅनेजमेंटने त्याच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली आहे.
जखमी मोहम्मद शमीची जागा संदीप वॉरियर घेणार आहे. संदीप वॉरियर आतापर्यं 5 आयपीएल सामने खेळला आहे. गुजरात टायटन्सने त्याला 50 लाखांच्या बेस प्राईसवर खरेदी करत संघात घेतलं आहे. 32 वर्षीय संदीप वॉरियरला आयपीएल खेळण्याचा तितका अनुभव नाही. 2019 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून डेब्यू केलं होतं. पण जास्त सामने खेळला नाही. त्याने पाच सामन्यात 7.88 इकोनमी रेटने 2 गडी बाद केले. 2019 मध्ये खेळलेल्या 3 सामन्यात 2 गडी बाद केले होते. तर 2020 आणि 2021 मध्ये एकही गडी बाद करता आला नाही.
गुजरातचा संपूर्ण संघ : शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, बी. साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, अजमतुल्ला ओमरझाई, उमेश यादव, शाहरुख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुथार, स्पेन्सर जॉन्सन आणि संदीप वॉरियर.