आयपीएल 2024 स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये कोण स्थान मिळवणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सुरुवातीच्या टप्प्यात निराशाजनक कामगिरी केली. सलग सात सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. असं असलं तरी संघांनी जोरदार कमबॅक केलं आहे. सलग पाच सामने जिंकत प्लेऑफच्या शर्यतीत असल्याचं दाखवून दिलं आहे. खऱ्या अर्थाने चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्यात सर्वकाही स्पष्ट होईल. दुसरीकडे, या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे. फक्त एक समीकरण जुळून आलं की दोघांची प्लेऑफची वाट मोकळी होईल. सनरायझर्स हैदराबाद 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तसेच दोन सामने शिल्लक असून 18 गुण मिळवण्याची शक्यता आहे. तर नेट रनरेट हा +0.406 इतका आहे. त्यामुळे आरसीबी आणि चेन्नई या दोन्ही संघांना जर प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचं असेल तर एक समीकरण जुळून आलं पाहीजे. दिल्ली कॅपिटल्सचे साखळी फेरीतील सर्व सामने झाले असून पाचव्या स्थानावर आहे. पण नेट रनरेट -0.377 असल्याने शक्यता नाहीच असं म्हंटलं वावगं ठरणार नाही. असंच काहीसं गणित लखनौ सुपर जायंट्सचं आहे. त्यामुळे दोन स्थानासाठी खरी रेस ही चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आहे.
सनरायझर्स हैदराबादचे पुढचे दोन्ही सामने स्पर्धेतून बाद झालेल्या गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ससोबत आहेत. गुजरातने साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात हैदराबादला 7 विकेट्स आणि 5 चेंडू राखून पराभूत केलं आहे. तर पंजाब विरुद्धचा सामना हैदराबादने फक्त 2 धावांनी जिंकला आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ हैदराबादसाठी डोकेदुखी ठरू शकतात. या दोन्ही संघांनी हैदराबादला मोठ्या फरकाने पराभूत केलं तर मात्र प्लेऑफचं कठीण होईल. पण यासाठी आरसीबीला चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा सामना जिंकावा लागेल. इतकंच काय तर चेन्नईचा नेट रनरेट हा हैदराबादपेक्षा चांगला असायला हवा.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना 16 मे रोजी आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात हा सामना होणार आहे. त्यानंतर 19 मे रोजी हैदराबाद आणि पंजाब किंग्स हे संघ भिडणार आहेत. हा सामना दुपारी 3.30 वाजता आहे. हा सामना देखील हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात आहे. तर चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात 18 मे रोजी सामना होणार आहे. खऱ्या अर्थाने प्लेऑफचा जीव या सामन्यात अडकलेला आहे.