मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे आयपीएलच्या आगामी 17 व्या मोसमाकडे लागलं आहे. या 17 व्या मोसमाआधी येत्या 19 डिसेंबरला मंगळवारी ऑक्शन पार पडणार आहे. या ऑक्शनचं आयोजन हे दुबईत करण्यात आलं आहे. या ऑक्शनमध्ये 77 जागांसाठी 333 खेळाडू मैदानात आहेत. ऑक्शनआधी केकेआर अर्थात कोलकाता नाईट रायडर्सने कॅप्टन बदलला. श्रेयस अय्यर याच्याकडे पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर नितीश राणा याला उपकर्णधारपदाची सूत्र देण्यात आली. त्यानंतर आता मुंबई इंडियन्स टीम मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेतला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्सने कॅप्टन बदलला आहे. कर्णधारपदावरुन रोहित शर्मा याची उचलबांगडी केली आहे. रोहित शर्मा 2013 पासून मुंबईचं नेतृत्व करत होता. तर आता हार्दिक पंड्या याला कर्णधार करण्यात आलं आहे. हार्दिक पंड्या याला मुंबई इंडियन्समध्ये गुजरात टायटन्स टीमधून ट्रेड करुन घेतलं होतं. त्याआधी हार्दिक 2015 ते 2021 पर्यंत मुंबई इंडियन्सकडूनच खेळायचा. आता येत्या 17 व्या मोसमात आता हार्दिक पंड्या याच्याकडे आपल्या कॅप्टन्सीत मुंबईला सहाव्यांदा चॅम्पियन करण्याची जबाबदारी असणार आहे.
हार्दिकने आपल्या नेतृत्वात पदार्पणातीलच हंगामात गुजरात टायटन्सला आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्याची कामगिरी केली. हार्दिकने 2022 मध्ये गुजरात टायटन्सला चॅम्पियन केलं होतं. मुंबईने हार्दिकला 2022 च्या लिलावाआधी करारमुक्त केलं होतं. मात्र आता पुन्हा हार्दिक मुंबईत आलाय आणि थेट कॅप्टन झालाय.
गुजरातच्या हार्दिक पंड्याकडे मुंबईचं नेतृत्व
Hardik Pandya announced as captain for the IPL 2024 season.
Read more➡️https://t.co/vGbcv9HeYq pic.twitter.com/SvZiIaDnxw
— Mumbai Indians (@mipaltan) December 15, 2023
रोहित शर्माने 2013 पासून ते 2023 या कालावधीदरम्यान मुंबई इंडियन्सचं नेतृत्व सांभाळलं. रोहितने या दरम्यान मुंबईला 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. रोहितने मुंबईला 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 या वर्षात ट्रॉफी जिंकून दिली. तसेच मुंबई गेल्या हंगामात प्लेऑफपर्यंत पोहचली. मात्र मुंबई त्यापुढे जाण्यात अपयशी ठरली.
दरम्यान रोहितने आतापर्यंत आयपीएलमध्ये 243 सामने खेळले आहेत. या 243 सामन्यांमध्ये रोहितने 130.05 च्या स्ट्राईक रेटने 1 शतक आणि 42 अर्धशतकांच्या मदतीने 6 हजार 211 धावा केल्या आहेत.