आयपीएल 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा कोलकाता नाईट रायडर्स हा पहिला संघ ठरला आहे. आता राजस्थान रॉयल्स, रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यापैकी एक संघ असेल. तत्पूर्वी क्वॉलिफायर 1 फेरीत कोलकाता आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हैदराबादने जिंकला. पण पहिल्या षटकापासून कोलकाच्याने हैदराबादचं कंबरडं मोडलं. पहिलं षटक स्टार्कने टाकलं आणि सामना तिथेच फिरवून टाकला. पहिल्याच षटकात ट्रेव्हिस हेडची महत्त्वाची विकेट घेतली. त्यामुळे हैदराबादला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. एका पाठोपाठ एक विकेट पडत गेल्या आणि हैदराबादचा संपूर्ण संघ 19.3 षटकात सर्वबाद 159 धावा करू शकला. तसेच विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान कोलकात्याने 2 गडी गमवून 13.4 षटकात पूर्ण केलं. या सामन्यात मिचेल स्टार्कने 4 षटकं टाकली आणि 34 धावा देत 3 गडी बाद केले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. सामन्यानंतर त्याने डोक्यात नेमकं काय सुरु होतं ते सांगितलं.
मिचेल स्टार्क म्हणाला की, “पॉवरप्ले किती महत्त्वाचा आहे हे आम्हाला माहीत आहे. बॅटसह पॉवरप्लेमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या या दोन बाजू होत्या. आम्हाला लवकर विकेट्स घेऊन त्यांच्या मधल्या फळीत आणण्याची गरज होती. संपूर्ण स्पर्धेत हेड आणि अभिषेक ज्या प्रकारे खेळत आहेत, त्यांना चेंडू लांब ठेवलेला आवडतो आणि त्यांचे हात मोकळे करतात. आम्ही फक्त चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूला लांबी दिली नाही.”
“बॉल स्टंप टू स्टंप आणि हार्ड लेंथ टाकण्याचा प्रयत्न केला. फिरकीपटू प्रभावी होते आणि संपूर्ण गोलंदाजी विभाग उत्तम होता. मी भाग्यवान आहे की हेडची विकेट घेतली.त्याला बाद केल्याने आनंद झाला. अलीकडच्या काळात आम्ही एकमेकांविरुद्ध खेळत आहोत.हर्षित आणि अरोरासाठी हे वर्ष अभूतपूर्व ठरले आहे. आमचे गोलंदाजी आक्रमण उत्तम आहे, कोणालाही बाहेर काढणे कठीण आहे. एक वयस्कर आणि परदेशी खेळाडू म्हणून पाहणे चांगले आहे. ते आयपीएलमध्ये आणि भारतासाठीही अनेक विकेट घेतील यात शंका नाही.”, असंही स्टार्कने पुढे सांगितलं.