आयपीएल 2024 स्पर्धेतील 73 सामने पार पडले आहेत आणि आता या स्पर्धेचा लेखाजोखा मांडण्याची वेळ आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद अशी लढत अंतिम फेरीत होणार आहे. पण तत्पूर्वी ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहलीच आघाडीवर आहे. त्याला आता तेथून दूर करणं काही सोपं नाही. खऱ्या अर्थाने सांगायचं तर विराट कोहलीच ऑरेंज कॅपचा मानकरी ठरेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ स्पर्धेतून आऊट झाला असला तर विराटची खेळी या पर्वात कायम स्मरणात राहणारी आहे. दुसरीकडे, पूर्वाश्रमीचा आरसीबीचा गोलंदाज आणि पंजाब किंग्सकडून खेळणारा हर्षल पटेल पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. 24 विकेट घेत पहिल्या स्थानावर आहे. आता त्याच्या जवळ पोहोचणं कोलकाता आणि हैदराबादच्या गोलंदाजांना पोहोचणं कठीण आहे. पंजाब किंग्सकडून खेळताना हर्षल पटेलने 14 सामन्यात 48 षटकं टाकत 477 धावा दिल्या आणि 24 गडी बाद केले. त्याच्या खालोखाल मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आहे. त्याने 20 गडी बाद बाद केले आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्सचा वरुण चक्रवर्थी आहे. त्याच्या नावावर 20 विकेट आहेत. त्याला अंतिम फेरीत अव्वल स्थान गाठण्याची संधी आहे. पण त्याला अंतिम फेरीत 4 षटकात 4 गडी बाद करावे लागतील. इतकंच काय तर त्याला इकोनॉमी रेटही चांगला ठेवावा लागेल. जर यात वरुण चक्रवर्थीला यश आलं तर पर्पल कॅप मिळू शकते. टी20 फॉर्मेटमध्ये चार गडी बाद करणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यामुळे पर्पल कॅप हर्षल पटेलच्या डोक्यावर राहील असंच वाटते.
सनरायझर्स हैदराबादकडून टी नटराजन रेसमध्ये आहे. पण त्याला इतकं मोठं अंतर कापणं काही शक्य होणार नाही. त्याने 13 सामन्यात एकूण 18 गडी बाद केले आहेत. त्याला अव्वल स्थान गाठण्यासाठी 6 गडी बाद करावे लागतील. हे काही शक्य नाही. त्यामुळे इथेही हर्षल पटेलची बाजू भक्कम दिसत आहे. टी नटराजनही या रेसमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे आयपीएल जेतेपद कोलकाता किंवा हैदराबादला मिळेल खरं पण ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपचे मानकरी भलतेच असणार आहेत.