आयपीएल 2024 स्पर्धेतील तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल सनरायझर्स हैदराबाद यांच्या बाजूने लागला. कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि कोलकात्याला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. कोलकात्याने 20 षटकात 7 गडी गमवून 208 धावा केल्या. तसेच विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं.आंद्रे रसेलने 25 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी केली. यात 3 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. कोलकात्याने मोठी धावसंख्या उभारल्याने गोलंदाजांचं काम सोपं झालं होतं. मिचेल स्टार्क आणि इतर गोलंदाजांमुळे सामना आपल्या पारड्यात पडला होता. मिचेल स्टार्ककडून तशा खूप अपेक्षा होत्या. मात्र पहिल्याच सामन्यात मिचेल स्टार्कचं पितळ उघडं पडलं. चार षटकात 53 धावा दिल्या.
कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने पहिलं षटक मिचेल स्टार्कला सोपवलं. पहिले दोन चेंडू निर्धाव टाकले आणि तिसरा चेंडू वाइड टाकत पाच धावा दिल्या. त्यामुळे तिसरा चेंडू पुन्हा टाकण्याची वेळ आली. चौथ्या चेंडूवर 2 धावा, पाचव्या चेंडूवर चौकार आणि शेवटच्या चेंडूवर 1 धाव आली. पहिल्या षटकात मिचेल स्टार्कने एकही विकेट न घेता 12 धावा दिल्या.
संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक पुन्हा एकदा मिचेल स्टार्कला सोपवलं. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 4, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू निर्धाव, पाचव्या चेंडूवर एक धाव आणि सहाव्या चेंडूवर चौकार आला. दुसऱ्या षटकात एकही विकेट न घेता 10 धावा दिल्या.
मिचेल स्टार्क पुन्हा एकदा डेथ ओव्हरमध्ये परतला. त्याला 16 वं षटकं आणि त्याचं वैयक्तिक तिसरं षटक सोपवलं. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, चौथा चेंडू निर्धाव, पाचव्या चेंडूवर 1 धाव आणि सहाव्या चेंडूवर 1 धाव आली. तिसरं षटकं चांगलं पडलं. स्टार्कने बिनबाद 5 धावा दिल्या.
संघाचं 19 वं षटक मिचेल स्टार्कला सोपवलं 12 चेंडूत 39 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवरच क्लासनने षटकार ठोकला. दुसरा चेंडू निर्धाव टाकला. तिसरा चेंडू वाइड टाकला. तिसरा चेंडू परत टाकत क्लासेनने षटकार ठोकला. चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार आला. पाचव्या चेंडूवर एक धाव आली. सहाव्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार आला. चौथ्या षटकात एकूण 26 धावा दिल्या.