आयपीएल 2024 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 1 सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय सनरायझर्स हैदराबादला चांगलाच महागात पडला. कारण पॉवर प्लेमध्ये 4 महत्त्वाचे खेळाडू तंबूत परतले होते. त्यामुळे संघावर दबाव वाढला होता. असता असताना हेनरिक क्लासेन आणि राहुल त्रिपाठी यांनी मजबूत भागीदारी केली. इतकंच काय तर धावगतीही कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. 39 धावांवर 4 गडी अशी स्थिती असताना या जोडीने 62 धावांची भागीदारी केली. पण वरुण चक्रवर्थीच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात हेनरिक क्लासेन बाद झाला. त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि अब्दुल समाद ही जोडी जम धरत होती. दोघांमध्ये 20 धावांची भागीदारी जमली होती. पण एक चूक झाली आणि 55 धावांवर खेळत असलेला राहुल त्रिपाठी धावचीत होत तंबूत परतला. रस्सेलने केलेल्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाच्या जोरावर त्याला धावचीत व्हावं लागलं. पण राहुल त्रिपाठी ही धाव पूर्ण करू शकला असता. पण अर्धातच गडबड झाली आणि धावचीत झाला. त्यामुळे नेमकी चूक कोणाची असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने संघाचं 14वं षटक सुनील नरीनच्या हाती सोपवलं. पहिल्या चेंडूवर समादने उत्तुंग षटकार मारला. दुसऱ्या चेंडूवर समादने आऊटसाईड ऑफला जोरात मारला. आंद्रे रस्सेलने जबरदस्त उडी घेत हा चेंडू अडवला. दुसरीकडे, नॉन स्ट्राईक एंडला असलेला राहुल त्रिपाठी धावत सुटला. मध्येच आल्यानंतर त्याला रस्सेलने चेंडू पकडल्याची उपरती झाली आणि तो मध्येच थांबला. पण समदने त्याचा कॉल ऐकून क्रीस सोडत नॉन स्ट्राईकला धाव घेतली होती. त्यामुळे राहुल त्रिपाठी जाळ्यात अडकला आणि धावचीत झाला. ही धाव सहज पूर्ण झाली असती असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. त्यामुळे यात नेमकी कोणाची चूक हे आता तुम्हीच ठरवा.
Well played Rahul Tripathi but this runout 💔#KKRvsSRH #ipl2024live #HalaMadridpic.twitter.com/yhxACat3lY
— Mohd Anas (@Anas25th) May 21, 2024
कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन.