आयपीएल स्पर्धेत 21 सामना लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल लखनौच्या बाजूने लागला. कर्णधार केएल राहुल याने क्षणाचाही विलंब न करता फलंदाजी स्वीकारली. तसेच या निर्णयमागचं कारण सांगितलं. दुसरीकडे, गोलंदाजी आल्याने गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलही खूश होता. कारण नाणेफेकीचा कौल गमावला तरी वाटेला हवं तेच आलं होतं. लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 163 धावा केल्या. तसेच विजयासाठी 164 धावांचं आव्हान दिलं आहे. आता गुजरात टायटन्सचा संघ विजयी धावसंख्या गाठून गुणतालिकेत झेप घेतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
लखनौ सुपर जायंट्सकून क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र क्विंटन डी कॉक पहिल्याच षटकात एक षटकार मारून बाद झाला. त्यानंतर आलेला देवदत्त पडिक्कलही काही खास करू शकला नाही. फक्त 7 धावा करून तंबूत परतला. संघाची बिकट स्थिती असताना कर्णधार केएल राहुल आणि मार्कस स्टोइनिस यांनी डाव सावरला. दोघांनी संघासाठी आश्वासक भागीदारी केली. मात्र धावगती हवी तशी नव्हती. त्यामुळे 200 धावांचा पल्ला गाठणं कठीण असल्याचं दिसून आलं होतं. त्यात केएल राहुलची विकेट मोक्याच्या क्षणी गेली. 31 चेंडूत 33 धावा करून बाद झाला. यात तीन चौकारांचा समावेश होता. मार्कस स्टोइनिस 43 चेंडूत 58 धावा करून बाद झाला. त्याने 4 चौकार आणि दोन षटकार मारले. तर आयुष बदानी 11 चेंडूत झटपट 20 धावा करून बाद झाला. त्याने तीन चौकार मारले. शेवटी निकोलस पूरनने आक्रमक अंदाज दाखवला. तीन षटकार मारले.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), शरथ बीआर (विकेटकीपर), साई सुधारसन, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), देवदत्त पडिककल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, यश ठाकूर, नवीन-उल-हक, मयंक यादव.