आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 44 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ येथे करण्यात आलं आहे. संजू सॅमसन याच्याकडे राजस्थानचं नेतृत्व आहे. तर केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सचं कर्णधारपद सांभाळत आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. नाणेफेकीचा कौल राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागला. राजस्थान कॅप्टन संजू सॅमसन याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे लखनऊ सुपर जायंट्स पहिले बॅटिंग करणार आहे.
लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. दोन्ही संघांनी आपल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास ठेवत गत सामन्यातील प्लेईंग ईलेव्हन कायम ठेवली आहे. आयपीएलच्या इतिहासात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ एकूण 4 वेळा आमनेसामने आले आहेत. या 4 सामन्यात राजस्थान वरचढ राहिली आहे. राजस्थानने 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर लखनऊला एक सामन्यात विजय मिळवण्यात यश आलं आहे. तसेच लखनऊमधील या स्टेडियममध्ये दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने आहेत.
दरम्यान राजस्थान आणि लखनऊ या हंगामात दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. याआधी उभयसंघात 24 मार्चला आमनेसामने आले होते. तेव्हा राजस्थानने लखनऊवर 20 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता लखनऊ या पराभवाचा वचपा घेणार की राजस्थान प्लेऑफचं तिकीट निश्चित करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान आणि यश ठाकूर.