मुंबई | आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने निवडणुकांमुळे 17 व्या हंगामाचं पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार या हंगामातील पहिला टप्पा हा 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान एकूण 21 सामने होणार आहेत. या हंगामात 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकलेली मुंबई इंडियन्स टीम आपला पहिला सामना हा 24 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध खेळणार आहे. या 17 व्या मोसमाआधी मुंबई इंडियन्स टीममध्ये अनेक बदल झाले आहेत. मुंबईने ऑक्शनमधून एकूण 8 खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतलं. तर 11 खेळाडूंना करारमुक्त केलं. तर 15 खेळाडूंना कायम ठेवण्यात आलं. तसेच पलटणने 2 खेळाडूंना ट्रेड विंडोद्वारे आपल्या ताफ्यात घेतलं. तसेच यंदाच्या हंगामातील वयस्कर खेळाडूंपैकी एक मुंबईच्याच टीममध्ये आहे.
ट्रेड विंडोद्वारे घेण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये रोमरियो शेफर्ड आणि हार्दिक पंड्या या दोघांचा समावेश आहे. रोमरियो याला लखनऊ सुपर जायंट्स आणि हार्दिकला गुजरात टायटन्समधून घेतलंय. मुंबई यंदाच्या हंगामासाठी अनेक बदलांसह खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. मुंबईचा कॅप्टन बदलला आहे. रोहित शर्मा याच्याकडून नेतृत्व काढून घेण्यात आलं आहे. रोहितऐवजी ट्रेडद्वारे मुंबईत घरवापसी झालेल्या हार्दिक पंड्या याला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
अफगाणिस्तानचा ऑलराउंडर मोहम्मद नबी हा मुंबई इंडियन्स टीममधील वयस्कर खेळाडूंपैकी एक आहे. नबी 39 वर्षांचा आहे. नबीला मुंबईने ऑक्शनमधून 1 कोटी 50 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. सनरायजर्स हैदराबादने नबीला 2023 नंतर करारमुक्त केलं होतं. नबीने आतापर्यंत आयपीएलमध्ये 2 संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स टीमचा समावेश आहे.
मोहम्मद नबीची आयपीएल कारकीर्द
मोहम्मद नबी याने 17 एप्रिल 2017 रोजी सनरायजर्स हैजराबादकडून पंजाब किंग्स विरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केलं. तर नबीने 2021 मध्ये 8 ऑक्टोबर रोजी अखेरचा सामना खेळला होता. नबीने या 4 वर्षांमध्ये एकूण 17 सामने खेळले आहेत. नबीने या 17 सामन्यांमध्ये 15 च्या सरासरीने 14 डावात 180 धावा केल्या आहेत. तसेच 13 विकेट्स घेतल्या आहेत. नबीची 11 धावा देऊन 4 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
मोहम्मद नबीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बॅटिंग, बॉलिंगसह नेतृत्वाचा अनुभव आहे. त्यामुळे नबी तिन्ही आघाड्यांवर परिपूर्ण असा आहे. आता नबीच्या या अनुभवाचा कॅप्टन हार्दिक पलटणसाठी कसा आणि किती फायदा करुन घेतो, हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.
मुंबईने खरेदी केलेले खेळाडू | गेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, नुमान थुसारा, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज आणि नमन धीर.
मुंबई इंडियन्सने कायम ठेवलेले खेळाडू | रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टिम डेविड, विष्णु विनोद, अर्जुन तेंदुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल आणि जेसन बेहरेनडोर्फ.
ट्रेड केलेले खेळाडू | हार्दिक पांड्या (गुजरात टायटन्स) आणि रोमारियो शेफर्ड (लखनऊ सुपर जायंट्स)
रिलीज केलेले खेळाडू | अर्शद खान, रमनदीप सिंह, रितिक शौकीन, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, डुआन जेनसन, झाय रिचर्डसन, रिले मेरेडिथ, क्रिस जॉर्डन आणि संदीप वॉरियर.