मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू इशन किशन हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. कमी वयात प्रसिद्धी, नाव आणि पैसे मिळवणारा ‘पॉकेट डायनॅमो’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या इशान किशनसाठी यंदाची आयपीएल महत्त्वाची असणार आहे. बीसीसीआयने केंद्रीय करारामधून त्याला बाहेर केलं आहे. आयपीएलनंतर असणाऱ्या वर्ल्डकपमध्ये आपली जागा फिक्स करण्यासाठी किशनला आयपाएलमध्ये चमकदार कामगिरी करावी लागणार आहे. वय वर्षे 25 असणाऱ्या किशन याने पाच वर्षांमध्ये छाप पाडली आहे. 2016 साली गुजरात लायन्स संघाकडून पदार्पण करणारा इशान किशन मुंबईचा स्टार खेळाडू कसा झाला जाणून घ्या.
इशान प्रणव किशन याचा 8 जुलै 1998 रोजी बिहारमधील पाटणामध्ये जन्म झाला. इशान लेफ्टी हँड बॅट्समन असून तो कीपिंगही करतो. 2014 साली त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. पहिल्याच रणजीमध्ये हंगामामध्ये त्याने एक शतक आणी पाच अर्धशतकांसह सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर 2016 मधील अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये त्याच्याकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. टीम इंडियाचा फायनलमध्ये वेस्ट इंडिजकडून पराभव झाला होता. त्यानंतर तो आयपीएलच्या लिलावामध्ये उतरला.
इशान किशन याने आयपीएलमधील (डेब्यू) पहिला सामना 11 एप्रिल 2016 मध्ये खेळला. यामध्ये त्याला खास असं काही करता आलं नाही. पहिल्या सामना पंजाब किंग्सविरूद्ध त्याने 8 बॉलमध्ये 11 धावा केल्या होत्या. 2016मध्ये त्याने गुजरात संघाकडून पाच सामन्यांमध्ये 42 धावा केल्या यामधील 27 त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. 2017मध्ये त्याने 11 सामन्यात 277 धावा केल्या होत्या. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्यानंतर परत एकदा लिलावात उतरलेल्या इशान किशनला 2018 मध्ये मुंबई इंडियन्सने 6 कोटी 20 लाख रूपये देत आपल्या ताफ्यात घेतलं.
इशान किशन मुंबईत आल्यावर डिकॉक याच्या जागी ओपनिंगची संधी मिळाल्यावर त्याने खोऱ्याने धावा काढायला सुरूवात केली. रोहित शर्मासोबत फलंदाजीला येणाऱ्या इशान चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडायचा. 2022 साली तो लिलावात उतरला आणि त्याला मुंबईनेच 15 कोटी 25 लाखांची बोली लावत विकत घेतलं. 2020 मध्ये मुंबईने विजेतेपद जिंकलं त्यामध्ये इशन किशन याचा मोठ वाटा राहिला आहे. या हंगामामध्ये इशानने 14 सामन्यात 516 धावा केल्या होत्या यामध्ये त्याने 30 षटकार आणि 36 चौकार मारले होते.
इशान किशन याने 91 आयपीएल सामने खेळले असून 85 डावांमध्ये त्याने 29.42च्या सरासरीने 2324 धावा केल्या आहेत. यामध्ये 99 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या असून त्यामध्ये 15 अर्धशतकांचा समावेश आहे. इशानने आतापर्यंत आयपीएलमध्ये 220 चौकार आणि 103 षटकार मारले आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याच्याकडून मुंबईला अपेक्षा असणार आहेत. हार्दिक पंड्या आणि इशान किशन हे चांगले मित्र आहेत.
मुंबईने खरेदी केलेले खेळाडू | गेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, नुमान थुसारा, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज आणि नमन धीर.
मुंबई इंडियन्सने कायम ठेवलेले खेळाडू | रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टिम डेविड, विष्णु विनोद, अर्जुन तेंदुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल आणि ल्यूक वुड.
ट्रेड केलेले खेळाडू | हार्दिक पांड्या (गुजरात टायटन्स) आणि रोमारियो शेफर्ड (लखनऊ सुपर जायंट्स)
रिलीज केलेले खेळाडू | अर्शद खान, रमनदीप सिंह, रितिक शौकीन, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, डुआन जेनसन, झाय रिचर्डसन, रिले मेरेडिथ, क्रिस जॉर्डन आणि संदीप वॉरियर