क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या 17 व्या मोसमापासून महेंद्रसिंह धोनी याच्या विस्फोटक आणि फिनिशिंग टच असणाऱ्या खेळीची प्रतिक्षा होती. चाहत्यांना चेन्नईच्या पहिल्या 5 सामन्यात धोनी स्टाईल खेळी पाहायला मिळाली नाही. मात्र धोनीने मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई विरुद्धच्या सामन्यात आपल्या चाहत्यांची प्रतिक्षा संपवली आणि आपल्या फिनिशिंग मास्टर का म्हणतात, हे पुन्हा सिद्ध करुन दाखवलं. धोनीने डावातील शेवटच्या अर्थात 20 व्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्या याच्या बॉलिंगवर एकूण 4 बॉलमध्ये सलग 3 सिक्ससह 20 धावा केल्या. धोनीच्या या फटकेबाजीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबईने टॉस जिंकून कॅप्टन हार्दिक पंड्या याने चेन्नई सुपर किंग्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं. चेन्नईने 7.5 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावल्या. अजिंक्य रहाणे 5 आणि रचीन रवींद्र 21 धावा करुन आऊट झाले. त्यामुळे चेन्नईची 2 बाद 60 अशी स्थिती झाली. त्यानंतर शिवम दुबे आणि कॅप्टन ऋतुराज गायकवाड या दोघांनी डाव सावरत टॉप गिअर टाकला. या दोघांनी मुंबईची बॉलिंग फोडून काढली. दोघांनी चौफेर फटकेबाजी केली. ऋतुराजनंतर शिवम दुबे यानेही अर्धशतक पूर्ण केलं. मात्र मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने ही सेट जोडी फोडून काढली.
ऋतुराज गायकवाड 40 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 5 फोरसह 69 धावांवर बाद झाला. दुबे आणि गायकवाड या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. ऋतुराजनंतर डॅरेल मिचल मैदानात आला. मिचेलने संथ खेळी करत चेन्नई एक्सप्रेसला लोकल करुन टाकली आणि मुंबईचा फायदा केला. मिचेल संथ खेळत असल्याने चेन्नई समर्थक संतापले. मात्र त्यानंतर 14 बॉलमध्ये 17 धावा करुन डॅरेल आऊट झाला. डॅरेल 20 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर आऊट झाला. डॅरेलनंतर मैदानात धोनीची एन्ट्री झाली. धोनी धोनी असा जयघोष सुरु झाला. चाहत्यांनी धोनी धोनी घोषणेने स्टेडियम दणाणून सोडला.
धोनीने उर्वरित 4 बॉलमधील पहिल्या 3 बॉलमध्ये सलग 3 सिक्स ठोकले.तर शेवटच्या बॉलवर 2 धावा घेतल्या. धोनीने सलग मारलेल्या 3 सिक्समुळे चाहते आनंदी झाले तर हार्दिकचा चेहरा पाहण्यासारखा झालेला. धोनीच्या या खेळीमुळे क्रिकेट चाहते आनंदी झाले. इतकंच काय तर रोहितलाही आनंद झाला. धोनीने 4 बॉलमध्ये 500 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 20 धावा केल्या. त्यामुळे चेन्नईला 200 पार मजल मारता आली. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 4 बाद 206 धावा केल्या आणि मुंबईसमोर 207 धावांचं आव्हान ठेवलं.
धोनीची पैसावसूल खेळी
MS DHONI – 6,6,6 IN THREE CONSECUTIVE BALLS IN 20th OVER. 🤯🔥🦁 pic.twitter.com/accAqHFhl7
— Johns. (@CricCrazyJohns) April 14, 2024
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि आकाश मधवाल.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे आणि मुस्तफिजुर रहमान.