आयपीएल 2024 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 10 धावांनी पराभव करत गुणतालिकेत पाचवं स्थान गाठलं आहे. दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 258 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 4 गडी गमवून 257 धावा केल्या होत्या. मुंबई इंडियन्सने विजयासाठी दिलेलं आव्हान गाठताना निराशाजनक सुरुवात केली. रोहित शर्मा आणि इशान किशन स्वस्तात बाद झाले. त्यानंतर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेला सूर्यकुमार यादवने फटकेबाजी करत दिल्लीचं टेन्शन वाढवलं होतं. सूर्यकुमार यादवने 13 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 26 धावा केल्या. पण खलील अहमदने त्याला तंबूचा रस्ता दाखवला आणि दिल्ली कॅपिटल्सचा जीव भांड्यात पडला. या सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत याने मनातलं सर्व काही सांगून टाकलं. धाव फलकावर 250 हून अधिक धावा असूनही टेन्शन असल्याचं त्याने सांगितलं.
“आम्ही धाव फलकावर 250हून अधिक धावा केल्याने आनंदी होतो, पण इम्पॅक्ट प्लेयर्समुळे हा खेळ प्रत्येक दिवशी कठीण होत चालला आहे. मी स्टम्पच्या मागून गोलंदाजांना मदत करण्याचा प्रयत्न करतो पण गोलंदाजालाही आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. डेविड वॉर्नरला बसवण्याचा निर्णय आज कामी आला. जेक फ्रेझर मॅकगुर्कने चांगील फलंदाजी केली. आम्हाला तरुण खेळाडूंकडून अशाच खेळाची अपेक्षा असते. तो प्रत्येक सामन्यानंतर आणखी चांगला होत आहे. प्लेऑफमध्ये जाण्याची संधी दिवसेंदिवस वाढत आहे. पण आम्ही एकावेळी एकाच सामन्याचा विचार करत आहोत.”, असं दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने सांगितलं.
दिल्ली कॅपिटल्स आतापर्यंत एकूण 10 सामने खेळला असून त्यापैकी पाच सामन्यात विजय आणि पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. आता दिल्ली कॅपिटल्सचे चार सामने शिल्लक आहेत. यात चार पैकी चार सामन्यात विजय मिळवला तर 18 गुण होतील. पण आता सर्व काही जर तरच्या गणितावर अवलंबून असणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचे पुढचे सामने कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनौ सुपर जायंट्सशी होणार आहे.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, पियुष चावला, ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुमार कुशाग्रा, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, मुकेश कुमार, खलील अहमद.