आयपीएल स्पर्धेतील 20 सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडला. वानखेडेवर खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने अखेर विजय मिळवला आहे. नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला. असं असलं तरी विजय मात्र मुंबई इंडियन्सच्या पदारात पडला. कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा हा पहिला विजय आहे. सलग तीन पराभवामुळे हार्दिक पांड्या टीकेचा धनी ठरला होता. मात्र स्पर्धेतील पहिल्या विजयामुळे जीव भांड्यात पडला आहे. दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 5 गडी गमवून 234 धावा केल्या आणि विजयासाठी 235 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना दिल्ली कॅपिटल्सची दमछाक झाली. सुरुवातीला आक्रमक खेळी करून संघाला विजयाकडे नेणं काही जमलं नाही. ट्रिस्टन स्टब्सने सर्वोतोपरी प्रयत्न केले. मात्र धावा आणि चेंडूंमधील अंतर खूपच वाढलं होतं. अखेर विजयासाठी 29 धावा कमी पडल्या. दिल्ली कॅपिटल्स 20 षटकात 8 गडी गमवून 205 धावा करू शकला.
पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत याने सांगितलं की, “नक्कीच आम्ही या सामन्यात होतो, पण पॉवर प्लेमध्ये आमच्याकडून हव्या तशा धावा झाल्या नाहीत. खरं तर धावांचा पाठलाग करताना पॉवरप्ले महत्त्वाचा असतो. त्यानंतर आम्ही चांगल्या धावा केल्या. पण प्रत्येक षटकात 15 धावांचा रेपो कायम ठेवणं कठीण असतं. आम्ही गोलंदाजीतही काही ठिकाणी चुका केल्या. पण तसं सामन्यात कुठेतरी घडत असतं. गोलंदाजांनी विकेट टू विकेट, स्लोअर वन्स आणि गोलंदाजीत व्हेरियशन करणं गरजेच आहे. गोलंदाजांनी परिस्थितीचा अंदाज घेणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की काही ठिकाणी आम्ही सुधारणा करणं गरजेचं आहे. डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग आणि आमच्या फलंदाजीतही सुधारणा करणं आवश्यक आहे.”
दिल्ली कॅपिटल्सकडून पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनीच चांगली फलंदाजी केली. या व्यतिरिक्त इतर फलंदाज आपली छाप पाडण्यात अयशस्वी ठरले. पृथ्वी शॉने 40 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 66 धावा केल्या, तर अभिषेक पोरेलने 31 चेंडूत 41 धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्सने 25 चेंडूत 71 धावा केल्या. यात 7 षटाकर आणि 3 चौकार मारले. स्टब्स शेवटपर्यंत खेळला पण विजय मिळवून देता आला नाही.